आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका परिचारिकेवर तब्बल ३० महिला रुग्णसेवेचा भार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील गोरगरीब महिलांच्या आरोग्य सेवेचा प्रमुख आधार असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) रिक्त पदांमुळे एका परिचारिकेला सुमारे ३० ते ३५ महिला रुग्णांच्या सुश्रृषेचा भार वाहवा लागत आहे.शासनाच्या दिरंगाईमुळे परिचारिका कर्मचाऱ्यांची पदभरतीच बंद असताना रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे आहे त्या तोकड्या मनुष्यबळात परिचारिकांना जिल्हा स्त्री रुग्णालयाचा गाडा ओढावा लागत आहे. पर्याप्त मनुष्यबळाअभावी योग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाही असह्य वेदना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र रुग्णालयात दिसून येत आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयात शहराच्या तुलनेत ग्रामीण भाग मुख्यत्वे मेळघाटातील महिला प्रसूतीसाठी येत असतात. त्यातील बहुतांश अॅनिमियाग्रस्त असतात. त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ते टक्केच असते. परिचारिकांची संख्या अत्यल्प, रक्तपेठीचा अभाव, अत्यावश्यक औषधांच्या पुरवठ्यात अनियमितता अशा स्थितीत गरोदर महिलांची प्रसूती करणे फारच जोखमीचे असल्याचे अधीक्षक डाॅ. संजय वारे यांनी सांगितले.

रुग्णालयात २० कायमस्वरुपी परिचारिका आहेत. आधी ४४ कंत्राटी परिचारिका कर्मचारी होते. परंतु, त्यांना कामावरून कमी केले. कमी संख्येतील परिचारिकांसह डाॅक्टरांना सुमारे ४०० रुग्णांची देखभाल करणे कठीण जात होते. त्यामुळे वारंवार विनंती केल्यानंतर शासनाने १४ कंत्राटी कर्मचारी कामावर परत घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार आता एकूण ३४ परिचारिका कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर स्त्री रुग्णालयाचा भार आहे. नवीन भरती केली नाही तर रुग्णांचे हाल होतच राहणार. येथे केवळ २०० खाटांचीच सोय असल्यामुळे ज्या रुग्णाला खरेच खाटेची आवश्यकता आहे तिला खाट दिली जाते तर इतरांना मात्र खाली गाद्या टाकून त्यावर विश्रांती घ्यावी लागते. रुग्णालयातील २०० खाटांनुसार कर्मचाऱ्यांची शासनाद्वारे नियुक्ती करण्यात आली मात्र आता रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. त्यानुसार येथे कर्मचारी नियुक्त करायला हवेत, असे मत रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केले.

गत काही महिन्यांपासून सातत्याने शासनाकडे फाॅवेल बेडची मागणी केली जात आहे मात्र अद्याप स्त्री रुग्णांना आरामदायक ठरतील तसेच आवश्यकतेनुसार अशा या बेडची सोय करण्यात आली नाही. बहुतांश खाटा या वाकलेल्या स्थितीतील आहेत. याकडे लक्ष वेधल्यानंतरही नव्या साध्या खाटांची मागणीही पूर्ण झाली नाही. यासाठी मी मुंबईपर्यंत जाऊन राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी भेटू आलो. पुरेशा यंत्रणे अभावी येथील रुग्णांची हेळसांड होत असल्याचे त्यांच्या कानावर घातले आहे. त्यामुळे येत्या काही िदवसांत रुग्णालयात ज्या उणीवा आहेत त्या भरून निघतील असे अधीक्षकांनी सांगितले. आधी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सिझेरियन व्हायचे ही टक्केवारी आता बरीच कमी झाली आहे. नाॅर्मल डिलिव्हरीकडे आमचा कल आहे. यासाठी आम्हाला आमचेच औषध िमळाले तर त्याचा जास्त फायदा होईल, असे डाॅ. वारे म्हणाले.

एक्सपायरी जवळ आलेल्या औषधांमुळे तुटवडा
^स्त्री रोगतज्ज्ञांचे औषध हे जिल्हा शल्य चिकित्सकांकडून येता थेट आमच्यापर्यंत पाठवण्यात यावे. एक्सपायरी जवळ आलेली औषधे आमच्याकडे पाठवली जातात. त्यामुळे ती जास्त दिवस टिकू शकत नाही. परिणामी रुग्णालयात कायम अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असतो.’’
डाॅ.संजय वारे, अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय.

स्थायी रक्तपेढीची आहे आवश्यकता
स्त्री रुग्णालय असल्यामुळे येथे स्थायी रक्तपेढीची तातडीने आवश्यकता आहे. यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने जागाही तयार करून ठेवली आहे. परंतु, अद्याप शासनाद्वारे ही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. नुकताच याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मेळघाटातील रुग्ण हे अॅनिमिक (रक्ताची कमतरता) असतात. त्यामुळे त्यांना प्रसूतीदरम्यान तातडीने रक्त द्यावे लागते. काहींचा रक्तगट दुर्मिळ असतो. अशात जर रुग्णालयातच स्थायी रक्तपेढी असली तर रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना हकनाक त्रास सहन करावा लागणार नाही, असे मत रुग्णालय व्यवस्थापनाने व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...