आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यायामाने लकव्यातून सावरलेल्या डाॅक्टरची मॅरेथाॅन दौड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मनात आणले तर काहीही अशक्य नाही. अशाच निर्धाराने झपाटलेले डाॅ. अनिल खेरडे. लकव्यासारख्या दुर्धर रोगावर यशस्वीपणे मात करून जबर इच्छाशक्तीच्या बळावर डाॅ. खेरडे यांनी नुकतीच अमरावती येथे झालेली राज्यस्तरीय अर्ध मॅरेथाॅन शर्यत पूर्ण केली. ते सहा कि.मी. धावले. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव तर झालाच शिवाय अनेकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत आरोग्यदायी जीवनाची वाटचाल सुरू केली.
डाॅ. खेरडे यांच्यापासून प्रेरणा घेत शहरातील विविध भागांत लोक नियमितपणे शक्य असेल तेवढे धावण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळी धावण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांनीही डाॅ. खेरडे यांचे उदाहरण दिले. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील डाॅ. खेरडे यांना २०१० मध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लकवा झाला होता. चार दिवस ते अतिदक्षता विभागात कोमात होते. नंतर चार महिन्यांत तब्येतीत सुधारणा दिसू लागली. त्यामुळे डाॅ. खेरडे यांचाही उत्साह वाढला. मित्र, फिजिओंच्या प्रेरणेमुळे त्यांनी पाचव्या महिन्यापासून शहरातील मालटेकडीवर (शिवटेकडी) पायी फिरायला सुरुवात केली. काही महिने चालण्याचा नंतर हळूहळू धावण्याचा सराव सुरू केला. योगगुरू भाऊराव बारस्कर यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण आज कि.मी. अंतर यशस्वीपणे धावू शकलो, असे डाॅ. खेरडे यांनी सांगितले.

इच्छाशक्ती अन् नियमित व्यायामामुळे मनुष्य कोणत्याही आजारातून पुन्हा उभा राहू शकतो, असा प्रेरणादायी संदेशही स्वत: व्यवसायाने डाॅक्टर असलेल्या या धावपटूने या शर्यतीतून दिला. मालटेकडीवर धावण्यास सुरुवात केली तेव्हा तेथे नियमित व्यायामासाठी येणारे सहकारी नगरसेवक दिनेश बूब, सोमेश्वर पुसदकर, डाॅक्टर, फिजिओ कांडलकर, रामदेव बाबांच्या तालमीत तयार झालेले योगगुरू बायस्कर इतरांनी डाॅ. खेरडे यांचा उत्साह वाढवला. तुम्ही धावणारच अशी प्रेरणा ते सातत्याने देत राहायचे.

जीवन ही एक स्पर्धा
^जीवनही एक स्पर्धा आहे. येथे टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची प्रतिकारशक्ती बळ वाढवावे लागते. मनाने खचले तर काहीच शक्य नाही. नियमित योगासने, प्राणायाम आणि व्यायामामुळे मनुष्यात झुंजण्याची क्षमता वाढते. नियमित व्यायाम धावण्यामुळेच मी सध्या तंदुरुस्त आहे. -डाॅ.अनिल खेरडे, मॅरेथाॅनपटू

बातम्या आणखी आहेत...