अकोला - रुग्णालयात उपचार सुरू असताना तीन दिवसांचे बाळ दगावले. नातेवाइकांच्या ताब्यात मृत बाळ देण्याऐवजी दुसरेच जिवंत बाळ कपड्यामध्ये गुंडाळून देण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी ते घेऊन जात असताना बाळाने हालचाल केली. बाळाला घाईघाईत परत वाॅर्डमध्ये नेण्यात आले. तेथे जिवंत आणि मृत बाळाची अदलाबदली झाल्याचा प्रकार समोर आला. ही घटना बुधवारी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील अायसीयूत घडली.
रिसोड तालुक्यातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली. रविवारी तिने मुलाला जन्म दिला. मात्र, वजन कमी असल्यामुळे त्याला अायसीयूत दाखल करण्यात आले. बुधवारी बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांना बाळ दगावल्याची माहिती देण्यात आली. बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांनी कपडे आणले. मात्र, त्या कपड्यात मृत बाळाऐवजी दुसऱ्या जिवंत मुलीलाच गुंडाळून देण्यात आले. मात्र, काही अंतर गेल्यावर त्या मुलीने हालचाल केली. आपले बाळ तर जिवंतच आहे, असे समजून नातेवाईक लगेच अतिदक्षता विभागात दाखल झाले आणि बाळ जिवंत असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाला तपासले असता मुलगा नाही तर मृत म्हणून दुसऱ्याची मुलगी अंत्यसंस्कारासाठी दिल्याचे लक्षात आल्याने मोठी घोडचूक टळली.