आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वापसी म्हणजे चोरीची तक्रार टपाल खात्यात नोंदवणे! सेन यांचा टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘एखाद्या घटनेचा तुमच्या मनावर परिणाम होत नसेल तर तुम्ही कलाकारच नाही. त्यामुळे विरोध, प्रतिकार करणे हा कलाकाराचा जन्मसिद्ध अधिकारच असल्याचे मी मानतो. पण त्याची दिशा योग्य असायला हवी. सध्या सुरु असलेला पुरस्कार वापसीचा प्रकार अत्यंत अयोग्य आहे. हा म्हणजे चोरी झाल्यावर टपाल कार्यालयाकडे तक्रार करण्यासारखा प्रकार झाला’, असे परखड मत अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आणि संगीतकार शेखर सेन यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडले.
नागपुरात दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित कबीर महोत्सवात कबीर या एकपात्री नाट्यकृतीच्या सादरीकरणासाठी शेखर सेन नागपुरात होते. त्यांच्याशी झालेला संवाद असा:

>अनेक साहित्यिकांनी देशातील सध्याच्या वातावरणाबाबत नाराजी व्यक्त करून साहित्य अकादमीकडे पुरस्कार परत केले आहेत?
सेन : कुठल्याही घटनेचा तुमच्यावर परिणाम होत नसेल तर तुम्ही कलाकारच नाही, असे मला वाटते. प्रत्येक कलाकाराला विरोध, प्रतिकाराचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. पण आपला विरोध योग्य दिशेने आहे काय? याचा विचार व्हायला हवा.

>तुमचा नेमका कशाला विरोध आहे?
सेन : माझा विरोधाच्या माध्यमाला नेमका विरोध आहे. ऊस खाल्ल्यावर जिभ खराब होत असेल तर तुम्ही दात काढून टाकणार काय? सध्या तरी हे असेच चालू आहे. घटनेला कायदा आणि सुव्यवस्था जबाबदार आहे. त्याचा साहित्य अकादमीशी थेट काय संबंध आहे? साहित्य अकादमी अथवा संगीत-नाटक अकादमी या स्वायत्त संस्था आहेत. पुरस्कारासाठी कलाकारांची निवड अनुभवी कलाकारांचे पॅनेल करीत असते. त्यामुळे पुरस्कार परत करून तुम्ही तुमच्याच साहित्यिकांचा, कलाकरांचा अवमान करीत आहात ना. किमान विरोध करताना त्यात फेअरनेस असायलाच हवा. चोरी झाल्यावर टपाल कार्यालयात तक्रार नोंदविण्याचा हा प्रकार झाला. आम्ही क्रिएटीव्ह, टॅलेंटेड लोक आहोत, याचा विसर पडायला नको.

>मग विरोधाची कोणती दिशा योग्य राहू शकते, असे तुम्हाला वाटते?
सेन: पुरस्कार परत करणे हे सोल्यूशन नाहीच. तुम्ही साहित्यिक, कलाकार मिळून एखादी समिती स्थापन करु शकता. मुख्यमंत्री, पंतप्रधांनांना भेटून आपली तीव्र नाराजी त्यांच्या कानी घालू शकता. निवेदन देऊ शकता. जंतर मंतरवर निदर्शने करु शकता. गरज पडल्यास कोर्टातही जाऊ शकता. त्यात अकादमी काय करू शकते?

>साहित्य अकादमी भूमिका घेत नाही,
सेन : मग तुम्ही तिला राजकीय संस्था मानता काय? हे स्पष्ट झाले पाहिजे. जे माझे काम नाही ते मी का करावे? हेच मला कळत नाही.

>आणिबाणीसदृष्य स्थिती असल्याचा काही साहित्यिकांचा आरोप आहे?
सेन : मला तरी कुठे तसे वातावरण दिसले नाही. मला जे बोलायचे आहे, ते बोलू शकतो. लिहू शकतो. आता ज्यांना असे वाटते त्यांनी प्रतिकार जरूर करावा.
वृद्ध कलावंतांना पेन्शनसाठी प्रयत्न

>अकादमीच्या कलाकारांसाठी काय योजना आहेत?
सेन : गरजू, वृद्ध कलाकारांना वैद्यकीय मदत मिळावी, याला आमचे प्राधान्य आहे. शंभर टक्के जरी हे करू शकत नसलो तरी त्या दिशेने आमचे प्रयत्न आहे. गरजू कलाकारांना किमान दहा हजार रुपये पेन्शन अकादमीकडून मिळावी याचे प्रयत्न सुरु आहेत. देशभरातील शंभरावर कलाकारांना आम्ही मदत करीत आहोत. अगदी ईशान्येकडील राज्यातीलही कलाकार आहेत.