आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात १९६७ गावांना मिळणार दुष्काळी सवलती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील२०१५-१६ च्या खरीप हंगामातील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या १९६७ गावांना राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
२०१५-१६ च्या खरीप हंगामातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर झाल्याने ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावात उपाययोजना लागू करण्यात याव्यात, असे निर्देश अध्यादेशाद्वारे शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या सवलतींचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाला उचलावा लागणार असून, त्यासाठी दुष्काळग्रस्त गावांच्या तालुका कार्यालयांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असेही निर्देश अध्यादेशाद्वारे देण्यात आले आहेत.

अमरावती तालुक्यातील १४४, भातकुली तालुक्यातील १३७, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १६१, चांदूर रेल्वे तालुक्यातील ९०, धामणगाव तालुक्यातील ११२, तिवसा तालुक्यातील ९५, मोर्शी तालुक्यातील १५६, वरुड तालुक्यातील १४०, अचलपूर तालुक्यातील १८४, चांदूर बाजार तालुक्यातील १७०, दर्यापूर तालुक्यातील १५०, अंजनगाव तालुक्यातील १२७, धारणी तालुक्यातील १५३, चिखलदरा तालुक्यातील १५० गावांची आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे या सर्व गावांना राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार आहे.

सवलतींसाठी तालुक्यांना निर्देश
^खरीप हंगामातील दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना शासन निर्देशांप्रमाणे सवलती देण्यात याव्यात, असे निर्देश त्वरित देणार. शंकर शिरशुद्धे, उपजिल्हाधिकारी(महसूल)

या आहेत सवलती
१.जमीन महसुलात सूट, २. कृषिपंपांच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट, ३. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, ४. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, ५. दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित करणे.