शिरखेड : परिसरात मंगळवारी आलेल्या वादळी पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून डाळींबाच्या बागांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांवर मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी या नुकसानाची पाहणी करीत आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
वादळी वाऱ्यासह मंगळवारी पावसाने परिसरात हजेरी लावली. यामुळे कमळापूर, तुळजापूर, भांबोरा, कवठाळ या गावातील किसन उमक, देविदास आमले, बाबाराव खंडारे, रमेश सोमवंशी, गणेश भेंडे, रावसाहेब छापाने, पुरुषोत्तम छापाने, शिवदत्त कडू, दिलीप सहारे, विजय वानखडे, भाष्कर वानखडे, चक्रधर वानखडे, अण्णाजी इखे आदींच्या घरांवरील टिनपत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून दूर जाऊन पडली. पावसामुळे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आदींचे नुकसान झाले. याबाबत पंचायत समिती सदस्य भाऊराव छापाने यांना माहिती देण्यात आली. त्यांनी जिप सदस्य प्रा. संजय घुलक्षे, पंचायम समिती सभापती शंकर उईके, कमळापूर, तुळजापूर, भांबोरा कवठाळ येथील सेरपंच, ग्राम सचिव यांना पडझड झालेल्या घरांची पाहणी करण्याचे आदेश दिले. पंस सदस्य छापाने यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन शासनाकडून त्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. या वादळी वाऱ्यामुळे अण्णाजी इखे यांचे घर जिमनदोस्त झाले. अधिकारी पदाधिकारी यांनी लोकवर्गणीतून त्यांना मदतीचा हात दिला.
चार एकरातील बाग जमीनदोस्त
परिसरातील डाळींब उत्पादक कशेतरी गिरीधर मुंदाने यांच्या चार एकर शेतीमधील डाळींबाची बाग वादळी पावसामुळे पुर्णत: जमिनदोस्त झाली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकारी बनसोड यांना शासनाकडे नुकसानाचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले.