आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Sangh Social Environment Spoil Ashok Chavan

संघामुळे सामाजिक वातावरण बिघडले, अशोक चव्हाण यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिथावणीमुळे सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. सरकार घटनाबाह्य कामे करीत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केले. सोमवारी कस्तुरचंद पार्क येथे होणाऱ्या सोनिया व राहुल गांधी यांच्या सभेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संविधानाबद्दल केंद्र सरकारची भूमिका संदिग्ध आहे. या सरकारचा संविधानाचा गाभाच बदलविण्याचे प्रयत्न असावा, अशी शंका येते. दुष्काळाबाबत राज्यात स्फोटक परिस्थिती आहे. पाणी संपणार हे सरकारला माहीत नव्हते काय? तरीही सरकारने नियोजन केले नाही. सरकार जबाबदारीत चुकले. या संदर्भात दिवंगत विलासराव देशमुखांवर करण्यात आलेली टीका अशोभनीय आहे, असे चव्हाण म्हणाले. गोंदियाचे आमदार गोपाल अग्रवाल यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. यावरून सरकार मुद्यावरून गुद्यावर आल्याचे दिसते, असा चिमटा चव्हाण यांनी काढला.

खासगी क्षेत्रात आरक्षण हवे : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण हवे, असे सांगितले. १९९४ मध्ये मी राज्यसभेचा सदस्य असताना खासगी क्षेत्रात आरक्षण हवे असे विधेयक आणले होते. परंतु ते चर्चेला येण्यापूर्वीच माझ्या सदस्यत्वाची मुदत संपली. त्यामुळे ते बिलही बारगळले, असे शिंदे म्हणाले. परंतु आताच्या सरकारने त्यासाठी प्रयत्न करायला हवा. याबाबत राजकीय सहमती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे शिंदेंनी सांगितले.

सोनिया-राहुल यांची आज नागपुरात सभा
काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांचेे सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. तिथून दोघेही थेट दीक्षाभूमी येथे व नंतर सभास्थळी येतील. दोघेही एका व्यासपीठावर येण्याची पहिलीच वेळ असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सभेनंतर सोनिया दिल्लीला तर राहुल मुंबईला जाणार आहेत.

स्थगन प्रस्ताव आणू: विखे पाटील
अग्रवाल यांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा सभागृहात मांडणार आहोत. स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून यावर चर्चा करू. मंत्री सभागृहात आणि कार्यकर्ते बाहेर धमक्या देत आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.