आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानकरांनी ‘कृपया’ शब्द वापरला, तो धमकीत येतो? गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना शिक्षणमंत्री तावडे यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताना अधिकाऱ्यांना धमकावले होते. याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, या मागणीसाठी विधान परिषदेत मंगळवारी विरोधकांनी एकच गोंधळ घातला. विरोधक आक्रमक झालेले असताना संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांना म्हणणे मांडण्याची परवानगी सभापतींनी दिली. त्यावर नारायण राणेंनी जाेरदार आक्षेप घेतला. मात्र, तावडेंनी यावर नियमांचा दाखला देत सत्ताधाऱ्यांना २८९ वर बोलता येते, असे स्पष्ट केले आणि निवडणूक अधिकाऱ्याशी बोलताना जानकर यांनी “कृपया’ असा शब्द वापरला होता. कृपया हा शब्द धमकीत येताे काय, असा सवालही त्यांनी केला.

जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक सुरुवातीपासून आक्रमक दिसले. या विषयावरून आधी तीन वेळा सभागृह तहकूब झाले. शेवटी कामकाज रेटून नेण्याच्या प्रयत्नात चौथ्या वेळी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अामदार सुनील तटकरे यांनी २८९ अन्वये जानकर यांच्या विरोधात प्रस्ताव मांडला. जानकर यांनी मंत्रिपदाचा वापर करत निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणला हे चित्रफितीत स्पष्ट दिसत आहे. ही गंभीर बाब असून मुख्यमंत्र्यांनी जानकरांना पाठीशी न घालता तत्काळ त्यांना निलंबित करावे, अशी मागणी तटकरे यांनी केली. तर काँग्रेसच्या शरद रणपिसेंनी जानकरांबरोबर राज्याचा गृहविभागही दोषी असल्याचे सांगितले. पोलिसांनी १६० चे कलम न लावता जानकरांवर १६६ चे कलम लावले.

तावडे यांनी विरोधकांना केलेल्या सवालामुळे सभागृहात गोंधळ झाला आणि सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. अर्ध्या तासानंतर सभागृह सुरू होताच रणपिसेंनी जानकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. यावर भाजपचे आमदार भाई गिरकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराने जानकरांना कपबशी मागितल्याचे सांगताच विरोधकांनी गोंधळ घालत आक्षेप घेतला. राष्ट्रवादीच्या अमरसिंह पंडितांनी गिरकर हे खुलासा करणारे कोण? असा सवाल केला. यावर पुन्हा सभागृह तहकूब झालेे. दुसऱ्यांदा सभागृह सुरू झाल्यानंतर सभापतींनी कामकाजात समावेश नसल्याने २८९ चा प्रस्ताव नाकारत असल्याचे सांगितल्याने विरोधकांनी त्यांच्या अासनासमोर गोंधळ घातला आणि सभागृह तिसऱ्यांदा तहकूब झाले.

सभापतींनी तहकुबीनंतर कामकाज सुरू होताच कागदपत्रे सभागृहासमोर ठेवण्यास सांगितल्याने विरोधकांनी न्याय द्या, न्याय द्या, अशा घोषणा दिल्या. या गोंधळातच मंत्र्यांनी कागदपत्रे सभागृहासमोर ठेवली. शेवटी गोंधळ वाढत गेल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय सभापतींनी घेतला.
राणे व सभापतींमध्ये तू-तू मैं-मैं
जानकर हे त्यांच्यावरील आरोपांविषयी सभागृहातही खुलासा करू शकतात. दालनात जे ठरले त्यानुसार कामकाज होत असेल, तर मग आम्ही बोलायचे कशाला, असा सवाल काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी केला. शिवाय हे सभागृह नियमाने चालायला पाहिजे, असा टोलाही मारला. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी साफ नाराजी व्यक्त केली. आपण नेहमीच सभागृह नियमाने चालवतो. त्यामुळे तुमचे म्हणणे मी मान्य करणार नाही. यावर राणेंनी काही एक प्रतिक्रिया दिली नाही.
बातम्या आणखी आहेत...