आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनपासून दप्तराचे ओझे नक्कीच कमी होईल, शिक्षणमंत्री तावडे यांची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे नक्कीच कमी झालेले असेल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ‘दिव्य मराठी’च्या ‘जड नव्हे गोड दप्तर’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली. तावडेंशी झालेली बातचीत...
{ तुमच्या अजेंड्यावर दप्तराच्या ओझ्याच्या प्रश्नाला कितपत वजन आहे?
} हा गंभीर प्रश्न आहे. मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. ओझे वाढण्याची कारणेही खूप आहेत. अभ्यासक्रमाचे नियोजन नीट नाही. नाेकरी करणारे पालक मुलांना दप्तरात शिकवणी वर्गाच्या वह्या, क्रीडा साहित्यदेखील देतात. काही शाळांचे प्रकाशकांशी संबंध आहेत. त्यातून पुस्तके वाढतात. सीबीएसई व आयसीएसईमध्ये हे प्रकार खूप आहेत.

{ ... मग सरकारने काय भूमिका घेतलीय?
}आम्ही समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार शाळांना सूचना केल्या. शाळांनी दिवसाला किती विषय ठेवावे? गृहपाठाची पुस्तके रोज आणावी काय? अशा साऱ्याच बाबींवर शाळांना दिशादर्शन केले गेले. त्याचे पालन झाले तर निश्चितपणे ओझे कमी होणार.

{ ओझे कमी झाले नाही तर कारवाई करणार?
} कारवाई करणे सोपे आहे. मुख्याध्यापकाला घरी बसवणे, त्यांची पेन्शन थांबवणे, अनुदान बंद करणे. मात्र, हे करणे सोपे असले तरी मी केवळ कारवाईच्या मताचा नाही. शाळांना त्यासाठी मदत करण्याची माझी भूमिका आहे.
{मग अाेझे कमी झाले की नाही याचा आढावा घेणार कसा?
}आम्ही विभागस्तरावर चमू तयार करत आहोत. त्यात शिक्षणाधिकाऱ्यांसह तज्ज्ञ व इतर मंडळींचा समावेश असेल. त्यांनी शाळांमध्ये जाऊन अंमलबजावणीतील नेमक्या अडचणी समजावून घ्याव्यात, समस्येवर उपाय शाेधावेत, असे आम्हाला वाटते. केवळ अमूक दोषी, तमूक दोषी असे म्हणण्यात काही अर्थ नाही. या सत्रात दप्तराचे अाेझे कमी करण्याबाबत अंमलबजावणी व्हायलाच हवी, असा आग्रह आहेच. आताही तीस-चाळीस टक्के परिणाम दिसतो आहेच ना. आम्हालाही त्यांना थोडा वेळ द्यायला हवा.

{महाराष्ट्रातील पालकांना तुम्ही खात्री देणार आहात?
}होय. पुढच्या (जून २०१६ ) शैक्षणिक सत्रापासून मुलांच्या पाठीवरील ओझ्याचा प्रश्न पूर्णपणे संपलेला असेल, अशी खात्री मी पालकांना देतो.

{सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय सांगाल?
} साऱ्यांच्याच दप्तराचे ओझे कमी करा, असे कोर्टाने स्पष्टच केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही सूचना केल्याच आहेत. आमचे नियम शैक्षणिकदृष्ट्या त्यांना लागू होत नसले तरी ना हरकतसाठी त्यांना आमच्याकडे यावे लागते. अडवणुकीचे धोरण अामचे नाही. हा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्या शाळांकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत.

{ओझे कमी करण्यासाठी एखादे आदर्श मॉडेल सुचवले आहे काय?
}कुठलेही विशिष्ट मॉडेल नाही. प्रत्येक ठिकाणी त्याची स्थानिक पद्धतीने अंमलबजावणी होऊ शकते. साताऱ्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेतच पुस्तके ठेवण्याचा उपक्रम सुरू केला. शिक्षक रुची घेऊन त्यात वैविध्य आणू शकतात. मुलांच्या वयाच्या जास्तीत जास्त दहा टक्के दप्तराचे वजन असावे म्हणजे झाले.

{स्पर्धेच्या युगात मुलांवर अभ्यासाच्या ओझ्याबाबत शिक्षणमंत्री म्हणून तुमच्या काय भावना आहेत?
}आजकाल पालक मुलांना शर्यतीचा घोडा समजतात. मुलाने शाळेतही पुढे असावे. डान्स क्लासही करावा. सामान्य ज्ञानातही आघाडी मिळवावी, क्रीडा क्षेत्रातही नाव कमवावे, असे कितीतरी अपेक्षांचे ओझे मुलांवर लादले जाते. खरे तर ही पालकांमधील स्पर्धा आहे, असे मी मानतो. त्यात मुलांचे बालपण हरवून जाते. वाढत्या नागरिकरणाचे हे परिणाम आहेत. अशाने मुले केवळ चाकोरीबद्ध जीवन जगतील. ते तसे एकाच चौकटीत बांधलेले राहतील तर आयुष्याचा आनंद उपभोगू शकणार नाहीत, एवढेच मला पालकांना सांगावेसे वाटते. यावर जागृती हवी.