आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी, जावयाने जमीन घेतल्याचे 6 जूनपूर्वी माहीत नव्हते- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- भोसरी एमआयडीसीमध्ये पत्नी व जावयाने जमीन खरेदी केल्याची ६ जून २०१६ पूर्वी कल्पनाच नव्हती. मंत्रिपदाचा राजीनामा देतानाही या व्यवहाराची माहिती नव्हती, असा नवा दावा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी न्या. दिनकर झोटिंग आयोगापुढे झालेल्या उलटतपासणीत केला.
 
सूत्रांनुसार, माजी खडसे बुधवारी रविभवन येथे झोटिंग आयोगासमोर सुनावणीसाठी हजर झाले. त्यांचे वकील एम. जी. भांगडे हेदेखील उपस्थित होते. सव्वाचार तास सुनावणीदरम्यान एमआयडीसीचे वकील अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर खडसे यांनी दावा केला की पत्नी व जावयाने जमीन खरेदी केल्याची ६ जून २०१६ पूर्वी कल्पनाच नव्हती. जमीन मालकालाही मी कधीही भेटलेलो नाही.
 
 मी मुंबईला राहतो, तर पत्नी जळगावला. जावई एनआरआय आहेत. त्यामुळे या व्यवहाराची कल्पना मला नव्हती, असा दावा खडसे यांनी केला. यासंदर्भात एमआयडीसीच्या वकिलांनी आयोगासमोर  सांगितले की, खडसे यांनी संबंधित जमीन उकानी यांना परत करा अथवा नव्या कायद्यान्वये मिळणारी नुकसानभरपाई त्यांना द्या, असे आदेश दिले होते. खडसे यांनी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीचे मिनिट्स मान्य केले जात नसले तरी खडसे यांनी त्यासाठी बैठक घेतल्याचे सत्य दुर्लक्षित करता येणार नाही, असा दावाही एमआयडीसीच्या वकिलांनी आयोगासमोर केला आहे.
 
राजकीय वजन वापरले
दरम्यान, या प्रकरणात खडसे यांनी आपले राजकीय वजन वापरले. ती जमीन एमआयडीसीचीच आहे. याचे पुरावेही आयोगाला देण्यात आल्याचा दावा एमआयडीसीचे वकील अॅड. जलतारे यांनी सुनावणीपूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना केला. संबंधित जमीन एमआयडीसीचीच आहे, असा दावा करून जलतारे म्हणाले की, त्या एमआयडीसीत उद्योग सुरुही झाले आहेत. त्यामुळे जमीन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विक्री करार योग्य असल्याचा खडसेंचा पुर्वीचा दावा योग्य नाही.

या व्यवहारात खडसे दोषी आहेत की नाही, हे ठरविण्याचा अधिकार आयोगाचा असल्याचे स्पष्ट करताना अड. जलतारे यांनी सांगितले की, सुनावणीसाठी सातत्याने होत असलेल्या विलंबाला खडसे हेच जबाबदार आहेत. एमआयडीसी मुळीच जबाबदार नाही. केस संपण्याच्या मार्गावर असताना खडसे यांनी स्वत: साक्षीत उतरण्याचा पवित्रा घेतला. त्यात त्यांचा सुनावणी लांबवण्याचा हेतू असल्याचे म्हणता येणार नाही. मात्र, त्यांना पूर्वीची भूमिका बदलायची होती, असा दावाही त्यांनी केला. 
 
२७ ला पुन्हा सुनावणी
आयोगाची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला असून त्यात स्वत: न्या. झोटिंग खडसे यांना काही प्रश्न विचारणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी खडसे यांना पुन्हा एकदा आयोगापुढे हजेरी लावावी लागणार आहे.


काय आहे प्रकरण....?
खडसे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून भोसरीतील एमआयडीसीचा भूखंड कवडीमोल दरात आपली पत्नी व जावयाच्या नावे खरेदी केल्याचा आरोप पुण्यातील बिल्डर हेमंत गावंडे यांनी केला होता. त्याबाबतचे पुरावेही दिले होते. त्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मित्रपक्ष शिवसेनेनेही खडसेंना पदत्याग करण्याचा सल्ला दिला होता. इतकेच नव्हे तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा भूखंड एमआयडीसीचाच असल्याचे सांगितल्याने खडसेंच्या अडचणीत वाढ झाली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून याचा... लोकायुक्तांकडून खडसेंना क्लीन चिट मिळालेली नाहीच आणि व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...