आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटले अंधाराचे जाळे; गडचिरोली जिल्ह्यातील 23 अतिदुर्गम गावांत प्रथमच पोहोचली वीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली तालुक्यातील २३ अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावांत प्रथमच वीज पोहोचली. त्यावेळी आदिवासींचे चेहरे उजळून निघाले. एटापल्ली तालुक्यातील दुसागुडा या गावातील विद्युतीकरणाचा शुभारंभ नुकताच महावितरणचे चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्या हस्ते झाला.
 
दुसागुडा हे गाव एटापल्ली पासून ३५ किलोमीटर अंतरावर असून दुर्गम व चहुबाजूंनी जंगलाने वेढलेले आहे. साधारणत: दोनशेच्या आसपास लोकसंख्या असलेले हे गाव पूर्णपणे आदिवासीबहुल आहे. आदिवासी उपजीविकेसाठी शेतीपेक्षा जंगलावर अधिक अवलंबून आहे. अशा या गावाने आता प्रकाशाची वाट धरली आहे. सोबतच जिल्ह्यातील २३ गावांत वीज पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा २० डिसेंबर २०१६ पासून आजतागायत पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत गावांचे विद्युतीकरण महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे.
 
महावितरणच्या आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, तत्कालिन प्रभारी अधीक्षक अभियंता व सध्या ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता असलेले युवराज मेश्राम यांच्या मार्गदनाखाली धुसागुडा गावाचे विद्युतीकरण करण्यासाठी उपाययोजना केली.
 
या गावाच्या विद्युतीकरणासाठी ३.०९ किलोमीटर उच्चदाब वाहिनी व १.१ किलोमीटर लघुदाब वाहिनी उभारण्यात आली. दुसागुडा गावात पोहोचण्यास व्यवस्थित रस्ते नसतानादेखील महावितरणच्या आलापल्ली विभागातील एटापल्ली उपविभागाने विजेचे रोहित्र व तत्सम सामग्रीची व्यवस्था करत वीज पोहोचवून गावकऱ्यांच्या जीवनात प्रकाश पोहोचविला आहे.
 
दिलीप घुगल यांनी दुसागुडातील ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्याच हस्ते गावातील ७ कुटुंबांचे वीज जोडणीसाठी अर्ज स्वीकारून त्यांना तत्काळ विजेची जोडणी प्रदान करण्यात आली. राजू होळी, रेणू कंदेती, लालसू पुंगाटी, दलसू उसेंडी, सुधाकर गोटा, रावजी झुरी, साधू नरोटे या आदिवासी बांधवांच्या घरात महावितरणचा प्रकाश पोहोचला.
 
या गावांमध्ये पोहचली वीज...
धानोरा तालुक्यातील मरकेगाव, पुरसलगोंदी, मांगदाटोला, रेजूटोला, किसनेली, मोठीझेलिया, लहान वडगाव, सलाईटोला, मारगिनटोला, हुराटोला, केहकावाही, धुरमुडाटोला, येरंडीटोला, भुसुमकुडो, दब्बा, रानवाही व शिवगट्टा ही १७ व एटापल्ली तालुक्यातील एकराटोला, कुद्री, कामके, रोपी, पैदी व झुपी ही ६ गावे अशा २३ गावांत वीज पोहोचवण्याचे काम महावितरणने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...