आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्याचे अतिक्रमण पाडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अामदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी कार्यकर्त्याचे बडनेरा जुनी वस्ती येथील अतिक्रमण महापालिकेने आज (१४ जुलै) जमीनदोस्त केले. नागरिक तसेच प्रचंड राजकीय विरोधाला झुगारुन शहराच्या विविध भागात महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. 
 
बडनेरा जुनीवस्ती अलमास गेट समोरील खुल्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. शासकीय जागेवर कोल डेपोच्या नावाने आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्याकडून अतिक्रमण करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर शासकीय निधीतून मिळालेले बेंचेस देखील येथे लावण्यात आले होते. या शिवाय अतिक्रमण करीत मांस, चिकन तसेच अन्य दुकाने थाटण्यात आली होती. 

संपूर्ण अलमास गेट देखील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते. थाटण्यात आलेल्या दुकानदारांकडून रस्त्याच्या कडेला शिल्लक राहिलेले मांस टाकले जात असल्याने परिसरात नेमही दुर्गंधी राहत हाेती. आयुक्त हेमंत पवार यांनी दिलेल्या निर्देशानंतर बडनेरा जुनी वस्ती अलमास चौक तसेच जुना शुक्रवार बाजार येथील कंपाऊंड भिंतीच्या बाहेरील अतिक्रमण काढण्यात आले. अायुक्त हेमंत पवार यांच्या उपस्थितीत येथील अतिक्रमण काढण्यात आले. विद्यमान आमदार रवी यांच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आलेले अतिक्रमण अखेर महापालिकेकडून ध्वस्त करण्यात आले. 
 
बडनेरा जुनी वस्ती येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. परिसरातील सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी अतिक्रमण पथकाला गराडा घातला. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना नागरिकांकडून हाेत असलेला विरोध लक्षात घेता अतिक्रमण कारवाई करणे शक्य होत नव्हते. अखेर जमावावर नियंत्रण मिळवत येथील पानठेले, हॉटेल, मोटार गॅरेज मांस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला यश आले. सकाळी १०.३० वाजेपासून जवाहर गेट परकोटच्या आतील भागातील अतिक्रमण हटविण्यात आले. 

अतिक्रमण धारकांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अमरावती तहसील कार्यालय परिसरातील व्यावसायिकांकडून करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे, अतिक्रमण विभागातील निरीक्षक प्रवीण इंगोले, विजय गावंडे, उमेश सवाई, पोलिस उपनिरीक्षक सुनील जामनेकर यांच्यासह आरसीपी पथक कर्मचारी उपस्थित होते. 

शहरातील हॉकर्सवर महापालिकेची कारवाई 
अमरावती रेल्वे स्थानक ते बसस्थानक, मालटेकडी, राजेंद्र कॉलनी, रुख्मिणी नगर, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक या मार्गावरील वाहतूक बाधित करणारे अतिक्रमण काढण्यात आले. तसेच दुसऱ्या पथकाकडून इर्वीन चौक, मालवीय चौक, जुना कॉटन मार्केट, चित्रा चौक, जयस्तंभ चौक येथील रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या दुकानांसमोरील अतिक्रमण काढण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...