आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्याचा पुणे शहर सोडून खेड्यातील ४० गुंठ्यांत संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जगायला जागा तरी लागते किती? फक्त दहा गुंठे! मग आम्ही तर ४० गुंठ्यांत नवा संसार थाटलाय.. शहरी लाइफस्टाइलसह या शिवारवस्तीत आरामात जगता येईल. पाहिजे ते या मातीत आम्ही उगवू शकतो. तेही पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न करता. ज्या मातीतून भरभरून मिळते, तिच्याच सान्निध्यात जगणे किती सुखावह असते याचीची अनुभूती या रूरबन जीवनशैलीतून घेत आहोत.... पुण्यातील सुखवस्तू आयुष्याचा त्याग करून अंकोलीतील एकरभराच्या शिवारवस्तीत राहायला आलेले अभियंता वसंत सांगत होते. वैज्ञानिक अरुण देशपांडे यांनी ही शाश्वत जीवनशैलीची संकल्पना पुढे आणली आहे. रूरबन म्हणजे रूरल व अर्बन जीवनशैलीचा मिलाफ यात आहे. या प्रकल्पाशी कुटुंबांना जोडण्याचा त्यांचा मनोदय आहे.

कुटुंबप्रमुख वसंत हे सिव्हिल इंजिनिअर. त्यांच्या पत्नी गौरी देशपांडे एमएसडब्ल्यू व सामाजिक कार्यकर्त्या. थोरला मुलगा सिव्हिल इंजिनिअर, त्याची पत्नी कामिनी उत्तर प्रदेशातील आहेत. कामिनी यांचे बी.एस्सी. झालेले. वसंत यांचा धाकटा मुलगा रेशम २० वर्षांचा. पहिलीपासून त्याला शाळेत जाण्याची गरजच पडली नाही. घरातील प्रत्येक सदस्य त्याचे शिक्षक झाले. इंग्रजी, मराठी, हिंदीसह विविध भाषा व विषयांत तो पारंगत झाला. एका हाती लॅपटाॅप तर दुसऱ्या हाताने मातीत काम करण्याचे मूळ शिक्षण त्याने घेतले आहे. समृद्ध व शाश्वत अशा पर्यावरणपूरक विचारांनी परिपक्व असलेल्या वसंत यांच्या परिवाराने शहरी लाइफस्टाइलला नकार देत शिवार वस्ती कन्सेप्ट अंगिकारली आहे. सध्या १० कुटुंबांनी ही जीवनशैली अंगिकारण्याची इच्छा दर्शविली आहे.

रूरबन वसाहत काळाची गरज : देशपांडे
वन बीएचकेच्या कर्जात आयुष्य घालवून जगण्याची कसरत शहरात सुरू असते. शहरींच्या गरजा पुरवण्यासाठी खेड्यातील शेतकऱ्यांची ओढगस्ती सुरू असते. दोघेही समाधानी नाहीत. म्हणून खेडी भकास, तर शहरे बकाल दिसत आहेत. एका कुटुंबाला जगण्यासाठीच्या सोयी २० गुंठे जागेत मिळू शकतात. म्हणूनच ही रूरबन जीवनशैली आवश्यक आहे, असे या संकल्पनेचे प्रणेते अरुण देशपांडे यांनी म्हटले आहे.
विज्ञानग्राम, सोला(र)पूर
वैज्ञानिक अरुण देशपांडे अंकोलीत विज्ञानग्राम, सोला(र)पूर ही रूरबन शिवारवस्ती संकल्पना साकारत आहेत. शहरी राहणीमान सोडून मातीच्या सान्निध्यात शाश्वत जीवनशैली अंगिकारण्याची इच्छा असणाऱ्या परिवाराला ते विज्ञानग्रामचे सदस्य करून घेतात. वसंत यांचे कुटुंब येथे दाखल झाले. असे ५० परिवार जोडण्याचा संकल्पनेचे प्रणेते अरुण व सुमंगला देशपांडे या दांपत्याचा मानस आहे.
* सेंद्रिय शेतीसह पर्यावरणपूरक फार्म हाऊस प्रत्येक परिवाराला.
* वाॅटर बँक, एनर्जी, स्क्रॅप, शेल्टर, बियाणे बँकेचे परिवाराला सदस्यत्व.
* आदर्श जीवनपद्धती अंगिकारत कुटुंबाने रूरबन वसाहत उभारावी.
* रहिवाशांना कृषी पर्यटनाचा प्रयोगही करता येईल. प्रकल्प, प्रयोग पाहणीच्या पर्यटनातूनही या संकल्पनेचा खर्च निघू शकेल.
बातम्या आणखी आहेत...