आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी अभ्यासक्रम उद्योग पूरक असावे - सुभाष देसाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘अभियांत्रिकी अभ्यासक्रम उद्योग पूरक असावेत', असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित ४५ व्या आयएसटीईच्या राष्ट्रीय अधिवेशनात आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘द रोल अँड एक्सपेक्टेशन ऑफ इंडस्ट्री इन शेपिंग इंजिनिअरिंग एज्युकेशन’ यावरील परिसंवादाचे उद्घाटन करताना ते रविवारी १० जानेवारीला बोलत होते.

उद्योगांना अद्ययावत दर्जेदार अशा अभियंत्यांची गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी विद्यापीठांनीदेखील आधुनिक दर्जेदार अभ्यासक्रम तयार करणे गरजेचे आहे. या दर्जेदार अभ्यासक्रमातून कुशल अभियंते घडावेत, अशी अपेक्षा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता अाहे, असे सांगत इंजिनिअरिंग क्षेत्रातील अभ्यासक्रम हे उद्योगांना पूरक असे कुशल मनुष्यबळ घडवण्यावर केंद्रित करणारे असण्याची अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्रात मर्सडिज बेन्झ, जनरल मोटार्स, फॉक्स व्हॅगन, बॉश, या आंतरराष्ट्रीय ब्रँडनी गुंतवणूक केली आहे. या उद्योगांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ घडवण्याचे आव्हान तंत्रशिक्षण संस्थांसमोर आहे. मेक इन इंडिया या मोहिमेला उद्योग क्षेत्रातून प्रचंड प्रतिसाद असून, जेव्हा आपल्याला लागणाऱ्या सर्व उत्पादनांचे उत्पादन भारतात होईल त्यावर मेड इन इंडिया, असा शिक्का असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपली स्वप्नपूर्ती होईल. सुरक्षा रक्षकाच्या उदाहरणाद्वारे त्यांनी कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात वस्त्रोद्योग पार्कची निर्मिती होत असून, जवळच असलेल्या नांदगावपेठ येथील वस्त्रोद्योग पार्कमधून १० हजार युवकांना रोजगार प्राप्त होतील, असेही त्यांनी सांगितले. उद्योगमंत्र्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुंतवणुकीचा आढावा घेतला. तीन दिवसीय परिषदेतून चांगल्या कल्पना पुढे याव्यात, यासाठी विचारमंथन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी व्यासपीठावर खासदार आनंदराव अडसूळ, ‘आयएसटीई’चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, जपानचे ताजिमा तोशियो, डॉ. इसामु कोयामा, डॉ. रमेश गोडबोले, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, संचालक तंत्रशिक्षण एस. के. महाजन, नवी दिल्लीचे डॉ. ए. के. नासा, एमएसबीटीईचे मुंबई डॉ. अभय वाघ उपस्थित होते. प्रास्ताविक पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी केले. डॉ. अनंत मराठे यांनी परिषदेला शुभेच्छा देणाऱ्या संदेशांची वाचन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या परिषदेसाठी संदेश पाठवले होते. अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरणही या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रतापसिंह देसाई, मोहन खेडेकर यांची समयोचित भाषणे झाली.
बातम्या आणखी आहेत...