आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहकांच्या हातामध्ये येणार ईटीआयएम मशीन, तिकीट वितरणाची प्रणाली सुटसुटीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एसटी महामंडळाने वाहकांना इलेक्ट्रॉनिक्स तिकीट इश्यू मशीन (ईटीआयएम) देण्याचा निर्णय घेतला आहे. हे मशीन कसे हाताळावे याचे वाहकांना लवकरच प्रशिक्षण दिले जाईल. या मशीनमुळे बस कोणत्या रस्त्यावरून जात आहे. बसमध्ये किती प्रवासी आहेत, याची माहिती आगारासह वरिष्ठ कार्यालयांना ऑनलाइन मिळणार अाहे.
एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याचबरोबर गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रयत्न होत आहे. पूर्वी अस्तित्वात असलेली तिकीट वितरण प्रणाली किचकट होती. त्यामुळे वाहकांना इलेक्ट्राॅनिक तिकीट इश्यू मशीन देण्यात आले. या मशीनमुळे एकापेक्षा जास्त तिकिटे एकाच वेळी देणे शक्य झाले आहे. त्यानंतर आता इंटरनेटच्या साहाय्याने तिकीट देण्यासाठी इलेक्ट्राॅनिक्स तिकीट इश्यू मशीन विकसित करण्यात आले आहे. या मशीनमुळे प्रत्येक वाहक एसटी महामंडळाशी थेट जोडला जाईल.
प्रत्येक फेरीनंतर वाहकांना हे मशीन आगारात जमा करणे बंधनकारक असेल. वाहकाने मशीन जमा केल्यानंतर ते चार्जिंग करण्यासह त्यात काही तांत्रिक दोष आहेत किंवा कसे याची पडताळणी करण्यात येईल. या मशीनमुळे बस कोणत्या रस्त्यावरून जात आहे, बसमध्ये किती प्रवासी बसले आहेत, बसच्या किती फेऱ्या झाल्या याची माहिती एका क्लिकसरशी उपलब्ध होणार आहे. ही माहिती आगारासह राज्यस्तरावर पाहता येईल.

प्रवासादरम्यान बस नादुरुस्त झाली तर वाहकाला तातडीने आगाराला माहिती देता येईल. नवीन तिकीट मशीनमुळे तिकीट विक्रीत होणारी अफरातफर रोखणे शक्य होईल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या मशीनमुळे एकापेक्षा जास्त तिकिटे एकाच वेळी देणे शक्य झाले आहे. यामुळे वाहकांना सोयीचे झाले आहे.

स्वतंत्र यंत्रणा
ईटीअायएम यंत्रणेसाठी खासगी कंपनीला काम देण्यात येणार आहे. कंपनीकडून विभागासह आगार स्तरावर अभियंता कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण देणार
ईटीआयएम यंत्रणा सुरू करण्यापूर्वी वाहकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कामकाजाविषयी माहिती देण्यात येणार आहे. यंत्र उपलब्ध झाल्यानंतर वाहकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.