आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक शेतकऱ्याला आता जीवनदायी योजनेचा लाभ, दुर्धर आजारांवरही होणार मोफत उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सततची नापिकी दुष्काळी परिस्थितीमुळे विविध समस्यांच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना एखादा गंभीर आजार झाल्यास त्याला साधा श्वास घेण्यासही जागा मिळत नाही. गंभीर आजारांच्या रुग्णसेवा फाटक्या खिशांच्या शेतकऱ्यांना परवडणाऱ्याच नाहीत. परंतु, शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळाला असून, जिल्ह्यातील १४ रुग्णालयांमध्ये या योजनेची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.

सद्य:स्थितीत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये दारिद्र्यरेषेमधील पिवळी शिधापत्रिका, अन्न योजना, अन्नपूर्णा दारिद्र्यरेषेवरील (१ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या) केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा समावेश आहे. मात्र, सरसकट शेतकऱ्यांना लाभ दिल्या जात नव्हता. मात्र, शेतकऱ्यांची अलीकडच्या काळातील आर्थिक परिस्थिती पाहता राज्य शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा उपचारासाठी लाभ देण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच घेतला आहे. या योजनेंतर्गत या पुढील काळात केवळ शेतकरी ही एकमेव अट ठेवण्यात आली आहे. जो व्यक्ती शेतकरी असेल त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. नव्याने या योजनेचा लाभ अमरावती जिल्ह्यातील सर्वच शुभ्र (पांढरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

ज्या शेतकरी कुटुंबाकडे शुभ्र शिधापत्रिका आहे, त्यांना सदर शिधापत्रिकेच्या किंवा ७/१२ उताऱ्याच्या आधारे राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळणार आहे. हा लाभ घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव शिधापत्रिका किंवा ७/१२ उताऱ्यावर समाविष्ट नसल्यास, अशा वेळी सदर सदस्य हा त्या शेतकरी कुटुंबातीलच सदस्य असल्याबाबतचे नजीकच्या संबंधित महसुली अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्रावर लाभ घेता येणार आहे.

हा महत्त्वाचा पर्याय शासनाने ठेवला आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी बाधा येणार नसल्याचे दिसते. या योजनेंतर्गत रुग्णांवर पॅनलवर असलेल्या रुग्णालयांमध्ये दीड लाखापर्यंत मोफत उपचार केले जातात, तर किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपयांपर्यंतची तरतूद केली आहे. शासनाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच आधार होणार आहे. आठ दिवसांपूर्वी यासंदर्भात शासनाने आदेश काढले आहे. त्यामुळे या बदलानुसार शेतकऱ्याला लाभ देण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता स्थानिक पातळीवरून तातडीने करण्यात येत आहे. त्यामुळेच स्थानिक स्तरावरून यासंदर्भात आवश्यक पाठपुरावा सुरू असून, येत्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आता वरील निकषाप्रमाणे जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लवकरच मिळेल सुविधा
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे ज्या रुग्णालयात या योजनेद्वारे उपचार केले जातात, त्या सर्व रुग्णालयांमध्ये लवकरच सर्व शेतकऱ्यांना योजनेमधून उपचार मिळेल. यासाठी तांत्रिक बाबी लवकरच पूर्ण करण्यात येतील. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही ई-मेल पाठवला असून, लवकरच त्यासंदर्भातील 'पोर्टल' आम्ही 'अॅक्टिव्ह' करणार आहोत. डाॅ. इंद्रजित किल्लेदार, जिल्हासमन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना.

या रुग्णालयांमध्ये मिळणार सुविधा
- जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती
- जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती
- सुपर स्पेशालिटी रुग्णालय
- उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर
- डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय रुग्णालय,अमरावती
- हायटेक मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, अमरावती
- डॉ. बारब्दे हॉस्पिटल, अमरावती
- मातृछाया रुग्णालय, चांदूर रेल्वे
- सृजन कॅन्सर रुग्णालय, अमरावती
- संकल्प डायलीसिस सेंटर, अमरावती
- माझी माय रुग्णालय
- श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल ,अमरावती.
बातम्या आणखी आहेत...