आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांत ५०% वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेती करण्यास अक्षम या कारणांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तब्बल ४० टक्क्यांनी तर मराठवाड्यात ५० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची धक्कादायक माहिती आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम आणि वर्धा या सहा जिल्ह्यांत २०१४ मध्ये ९६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर, २०१५ मध्ये हा आकडा १३४८ वर पोहोचला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी २०१५ या एका वर्षात ३८४ आत्महत्या वाढल्या. वाढलेले हे प्रमाण ४० टक्के आहे.

दहा वर्षांपूर्वी २००६ मध्ये विदर्भातील या सहा जिल्ह्यात १४४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मराठवाड्यात २०१४ मध्ये ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या विभागातील आठही जिल्ह्यांत २०१५ मध्ये ११३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या पैकी ७९४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारने पात्र ठरवून या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत दिली आहे. यात २९४ आत्महत्या अपात्र ठरवण्यात आल्या. २०१६ मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांतील ५२ दिवसांत मराठवाड्यात १३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याच ५२ दिवसांत विदर्भातील सहा जिल्ह्यांत १३० आत्महत्या झाल्या.

पात्र प्रकरणांमध्येही वाढ : आत्महत्याकेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी तहसीलदारांच्या कार्यकक्षेत आत्महत्यांच्या कारणांची शहानिशा करण्यात येते. याबाबतचे निकष लागू झाले तरच आत्महत्येचे प्रकरण पात्र ठरवून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षांच्या तुलनेत आत्महत्यांच्या पात्र प्रकरणांत २५४ ने वाढ झाली आहे. गतवर्षी ६७८ शेतकरी आत्महत्या पात्र ठरवण्यात आल्या होत्या, तर या वर्षी २०१५ मध्ये ९३२ आत्महत्या पात्र ठरवण्यात आल्या.
बीड,यवतमाळमध्ये सर्वाधिक आत्महत्या :यंदाच्या वर्षी २०१५ मध्ये मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक ३८६ आत्महत्या झाल्या आहेत.

कर्जपुरवठ्याचा प्रस्ताव
याआत्महत्याथांबवण्यासाठी या वर्षी सर्वच शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे, तर रोजगार हमी योजनेत १०० दिवसांचे काम देण्याचेही प्रस्तावित आहे. - किशोर तिवारी, अध्यक्ष,नाईक शेतकरी स्वावलंबी मिशन

२०१५ : मराठवाड्यातील आत्महत्या
एकूण : ११३३
औरंगाबाद १४४
जालना ८३
परभणी १०४
हिंगोली ४१
नांदेड १९०
बीड ३०१
लातूर १०६
उस्मानाबाद १६४
स्रोत : विभागीय आयुक्तालय अमरावती औरंगाबाद