आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकरी वारसदारांना मोफत औषधोपचार सेवा, दुष्काळग्रस्तांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर; वर्धेतील ‘वैद्यकीय जनजागृती मंच’ या सर्व पॅथींच्या डाॅक्टरांचा समावेश असलेल्या संघटनेनेही पुढाकार घेतला आहे. मंचतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी माेफत औषधोपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वर्धा आयएमएचे अध्यक्ष डाॅ. अनुपम हिवलेकर यांनी ही माहिती "दिव्य मराठी'ला दिली.

विविध आजारांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने निघालेल्या या मंचने नंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना माेफत औषधोपचार देण्याचा निर्णय घेतला. या मंचमध्ये एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, बीएएमएस, बीएचएमएस, एम. डी. अशा विविध पॅथींचे १०० डाॅक्टर्स सदस्य आहे. याशिवाय समाजकार्याची आवड असलेले ४० जण मंचशी संबंधित आहेत. त्यांना सहयोगी सदस्यत्व देण्यात आल्याचे डाॅ. हिवलेकर यांनी सांगितले. शिवाय वर्धेतील आयएमए शाखाही यात सहभागी आहे. डाॅ. सचिन पावडे मंचचे अध्यक्ष असून डाॅ. यशवंत हिवांच सचिव आहेत.

संपूर्ण गावालाच कार्ड वाटप
नाम फाउंडेशनने वर्धा जिल्ह्यातील आमला हे ७०० ते ८०० लोकवस्तीचे गाव दत्तक घेतले. गावात सर्वांना मंचाने वैद्यकीय कार्ड देण्याचे ठरवले आहे. यात वर्धा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनची मदत असून, नागपूर येथील मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल्स कार्डधारकांना उपचारात ३० टक्के सवलत देणार आहेत.

वृद्धाश्रमात ओपीडी
वर्धा येथील मातोश्री वृद्धाश्रमात मंचने लहान दवाखाना सुरू केला अाहे. दर रविवारी तेथे मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात येतो. दर रविवारी एका डाॅक्टरची ड्यूटी तेथे लावण्यात आली आहे.

दिलासा कार्ड
मंचाने जिल्हाधिकारी कार्यालयातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची यादी मिळवली. िवधवा पत्नी, दोन अविवाहित मुले व आई-वडिलांना वैद्यकीय दिलासा कार्ड देण्यात आले. त्यावर नाव, वय, पूर्ण पत्ता, मृताशी नाते, शिक्षण अशी माहिती व छायाचित्र असते. मंचाच्या सदस्य डाॅक्टरकडे कार्डधारकास मोफत उपचार व औषधांवर दहा टक्के सवलत दिली जाते.