अमरावती- पासवर्ड किंवा ओटीपी दिलेला नसताना चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी येथील शेतकरी नानू चव्हाण यांच्या बँक खात्यातून चोरट्याने रक्कम उडवली. या प्रकरणात स्थानिक एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या स्तरावर चौकशीला सुरूवात केली आहे. त्यामुळेच दिल्ली गुडगावच्या (गुरुग्राम) ज्या एटीएममधून चव्हाण यांची रक्कम काढली.
त्या एटीएमवरील त्यावेळीचे सीसीटीव्ही फुटेज बोलवले अाहे. एखादा ग्राहकाने बँकेकडे तक्रार दिल्यानंतर बँकेने थेट गुडगावरून फुटेज बोलवून चौकशी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतकऱ्याच्या फसवणुकीचे वृत्त १९ जुलैला दै. दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. याच वृत्ताची दखल एसबीआयने घेतली आहे. शेतकरी नानू चव्हाण यांना चांदूर रेल्वे एसबीआयच्या शाखेत उद्धट वागणूक दिल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, क्षेत्रीय कार्यालयाकडे त्यांनी तक्रार नोंदवून रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली.
या संदर्भात दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले. या वृत्तानंतर शहरात राहणारे आशिष लढ्ढा राजश्री चाबुकस्वार या दोन ग्राहकांचीसुद्धा याच पद्धतीने फसवणूक झाल्याची आपबिती त्यांनी दिव्य मराठीकडे कथन केली. दरम्यान, लढ्ढा यांचे प्रकरण तातडीने नागपूर येथील झोनल कार्यालयाकडे पाठवले आहे, तर चाबुकस्वार यांच्या प्रकरणाला गती देण्याबाबतही संबधित कार्यालयासोबत चर्चा केली असल्याचे स्थानिक एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तोंडाला रुमाल बांधून काढली रक्कम
नानूचव्हाण यांच्या खात्यातून रक्कम ज्यावेळी गुडगावच्या एटीएमवरून काढण्यात आली, त्यावेळीचे फुटेजबाबत स्थानिक एसबीआय अधिकाऱ्यांनी गुडगावच्या संबंधित बँक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेतली. त्यांनी सांगितले आहे की, सदर वेळात रक्कम काढणाऱ्या व्यक्तींनी तोंडाला कापड बांधून रक्कम काढली आहे. फुटेज अमरावतीत पोहोचल्यानंतर आम्ही पाहणी करून तपासासाठी देणार असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.