आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी+ पीक विमा = फक्त हेलपाटे, हवालदिल शेतक-यांचा संपूर्ण दिवस इंटरनेट कॅफेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्ज भरण्यासाठी शेतकरी रात्री साडे आठ वाजेपर्यंत सायबर कॅफेसमोर बसले होते. - Divya Marathi
अर्ज भरण्यासाठी शेतकरी रात्री साडे आठ वाजेपर्यंत सायबर कॅफेसमोर बसले होते.
अमरावती- शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असलेल्या शासनाने कर्जमाफी करून पीक विम्याची मुदत वाढवली असली तरी तांत्रिक पायाभूत सुविधाच उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना सकाळपासून रात्री उशीरापर्यंत अर्ज भरण्यासाठी दुनियाभराचे हेलपाटे घ्यावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यातच इंटरनेट कॅफेमध्ये विम्याचा अर्ज भरण्यासाठी प्रति अर्ज अडीचशे रुपये वसूल केले जात आहे.
 
दरम्यान शासनाने प्रथमच ‘ऐतिहासिक’ कर्जमाफी केली असली तरी शेतकऱ्यांना ऑगस्ट महिना आला तरी कर्ज मिळू शकल्याचे कृषी कर्जाच्या इतिहासात प्रथमच घडत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांनी डिजीटल व्हिलेजची संकल्पना मांडली असली तरी तीन वर्षात अर्ज भरण्यासाठी साध्या इंटरनेटच्या लहरीही उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे कर्जमाफी पीक विम्याचा जिल्ह्यात ‘बोऱ्या’ वाजल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
राज्य शासन हक्काच्या शेतमालाला समाधानकारक भाव देता विविध योजना राबविण्यात येत असल्याचे ढोल बडवले जात आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या फायद्याची पीक विमा योजना राबविण्यात येत असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु सुमारे तीन वर्ष होऊनही शेतकऱ्यांच्या खिशात भरमसाठ उत्पादन होऊनही मुद्दलही खुळखुळू शकल्याचे भीषण वास्तव आहे. सुमारे पंधरा पानांचा अर्ज भरून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या सध्या नाकीनऊ येत असून दहा हजार रुपयांच्या अग्रीम कर्ज वाटपाचीही सध्या बोंब आहे.

त्यातच यावर्षी जिल्ह्यात पावसाने कमालीचा ताण वाढवला असून सध्या जिल्ह्यात भीषण अवस्था निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून शासनाने पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून दिली असून किमान काहीतरी पदरात पडावे म्हणून शेतकरी सध्या विम्याचा अर्ज भरण्यासाठी दारोदार भटकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तालुक्याच्या ठिकाणी तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी इंटरनेट कॅफेत अर्ज भरण्यासाठी सुमारे अडीचशे रुपये मोजावे लागत आहे. सर्व्हर स्लो असल्यामुळे अख्खा दिवस शेतकऱ्यांना या कॅफेमध्ये काढावा लागत असल्याचे भयानक वास्तव दिसून येत आहे.
 

सेतूवर स्पष्ट नकार
सेतूकेंद्रावर पीकविम्याचा अर्ज लवकर डाऊनलोड होत नसल्याने सेतूकेंद्र संचालक शेतकऱ्यांच्या या कामाऐवजी अन्य कामांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक इंटरनेट कॅफेवर चकरा माराव्या लागत आहे. याबाबत तहसीलदार यांच्याकडे शेतकऱ्यांनी प्रत्यक्षरित्या संपर्क करुन अडचणी सांगितल्या. मात्र तांत्रिक बिगाड असल्याची बाब समोर आली.
 
संग्रामकेंद्रात संगणक परिचालक नाही
कर्जमाफी पीकविम्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे. प्रत्यक्षात गावपातळीवर ग्रामपंचायत स्तरावर असणारे संग्रामकेंद्र अस्तीत्वात असले तरी तेथे संगणकचालक कार्यरत नसल्यामुळे शेतकऱ्यांना सर्व कामे टाकून तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.

हवालदिल शेतक-यांच्‍या संतप्‍त भावना
बसचाही वांधा
सकाळपासून विम्याचा अर्ज भरण्यासाठी फिरत आहे. परंतु रात्र झाली तरी अर्ज भरता आला नाही. आता गावाला जाण्यासाठी बसही मिळते की नाही असा प्रश्न आहे. गावखेड्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजेल काय?’’
- गोपाळ मालठाणे, काकडा
 
वेबसाईटची कासवगती
येवदयात मोजकेच ऑनलाईन केंद्र आहेत. वेळ कमी असल्याने येथे धावपळ होत आहे. विमा भरन्या करीता खूप वेळ लागत आहे. वेबसाईट अत्यंत कासव गतीने चालत असल्याने सुद्धा एक एक अर्ज भरतांना खूप वेळ लागत आहे. त्यामुळे तासंतास येथे थांबावे लागत आहे.’’
- पंकज चांदूरकर, येवदा.
 
दहा हजारांच्या कर्जासाठीही अपात्र
यंदावेळेवरपाऊस आल्या मुळे पेरलेले वखरावे लागले. जवळचा पैसा निघून गेल्याने दहा हजाराच्या कर्जा करीतासुद्धा पात्र नसल्याचे सांगण्यात आले. कर्ज माफीचे निकष सुद्धा डोक्याबाहेर गेल्याने सुचेनासे झाले आहे. ’’
- शेखर जांभळे, येवदा.
 
रात्रीचे आठ वाजले
विम्याचा अर्ज भरण्यासाठी सकाळी अकरा वाजतापासून अख्खा दिवस गारद केला. आता रात्रीचे आठ वाजले आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जात आहे. अर्ज भरला जाईल की नाही काही सांगता येत नाही. डोकं काम करेनासे झाले आहे.’’
- मुरलीधर कुकडे, भिलोना
 
अख्खा दिवस गारद
यंदाचे वातावरण पाहता पीकविमा काढावा लागत आहे. परंतु त्याची तारीख संपल्याने बँकांनी विमा स्वीकारणे बंद केले. त्यामुळे सेतु किंवा ऑनलाईन केंद्रावर विमा भरण्याकरिता तोबा गर्दी झाल्याने अख्खा दिवस गारद करावा लागत आहे. गैरसोय दूर व्हावी.’’
- प्रमोद सरदार, वरुड कुलट
 
कंपन्यांचे हित अधिक
शासन शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांचेच हित अधिक जोपासत आहे. अर्ज ऑनलाईन मागीतले जात आहे. मात्र् सुविधा उपलब्ध नाहीत. वेळोवेळी नविन परित्रक काढल्या जात आहे त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. याची सरकारने दखल घ्यावी.’’
- राजाभाऊ टवलारकर, अध्यक्ष सेवा सह.सोसा.परतवाडा
 
नुसत्या चकरा
विम्याची तारीख वाढवून दिली असली तरी, आमच्या गावात ऑनलाईन केंद्रच नसल्याने विमा भरण्या करिता १० किलोमीटर वरुण येवद्याला गेल्या दोन दिवसापासून चकरा सुरु आहेत.त्यामुळे विमा भरावा कि नाही अशी अवस्था झाली आहे.’’
- गजानन पुंडकर, वरुड कुलट.
 
टोलवाटोलवी सुरू
शेतातील सर्वकामे सोडुन केवळ बँका ऑनलाईन केंद्रात चकरा मारण्यातच वेळ जात आहे. गावात कुठलीच सुविधा नसल्याने ,कर्जमाफी ,दहा हजाराचे तात्काळ कर्ज, पिक विमा या करीता लागणारे कागद पत्र, याची पात्रता या बाबतची माहितीच नसल्याने काही समजेनासे झाले आहे.’’
- विष्णुपंत चऱ्हाटे, कातखेड
 
विमा नव्हे लुबाडणूक
माझ्या कुटूंबातील पदम पवित्रकार, उषा पवित्रकर, तृप्ती पवित्रकार, ऋषिकेश पवित्रकार यांचे नावे शेती असुन कर्जदार शेतकरी असल्याने परस्पर ४० हजारापेक्षा अधिक विम्याची रक्कम कापण्यात आली. ही बाब फसवणूक करणारी आहे.’’
- पंकज पवित्रकार, आरेगांव
 
पुढील स्‍लाइडवर...जिल्‍ह्यातील कर्जवाटपाची स्थिती
 
बातम्या आणखी आहेत...