आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीनसह मुगासाठी हमीभाव ठरला मृगजळ, शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे फिरवली पाठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासनाने मूग, उडीद सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरू केली असली, तरी तीन प्रकारात वर्गवारी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने या खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे खुल्या बाजारात शेतमाल बेभाव विकला जात असल्याने हमी भावाची निर्माण केलेली सावली शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत अाहे. त्यामुळे खुल्या बाजारात शेतकऱ्यांना शेतमाल सरासरी १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल तोट्याने विकावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय खरेदी केंद्रावर तुलनेने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. 
 
जिल्ह्यात यावर्षी अल्प पावसाने सोयाबीन, मूग, उडदाचे पीक मातीमोल झाले. जे उत्पादन हाती आले ते परतीच्या पावसाला बळी पडल्याने सोयाबीन मातीमोल भावाने विकावे लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने हजारो शेतकऱ्यांनी या पिकावरून ट्रॅक्टर फिरवला आहे. अशा भीषण परिस्थितीत शासनाने हमी भावाने खरेदी केंद्र सुरू केले आहे. परंतु या खरेदी केंद्रावर केवळ ‘एफएक्यू’ दर्जाचा एकमेव शेतमाल खरेदी केला जात आहे. पूर्वी कापसाची शासकीय खरेदी तीन ग्रेड मध्ये केली जात असे. यासाठी ग्रेडरची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. 

त्यामुळे तुलनेने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत असे. परंतु सध्या सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्रावर ‘एफएक्यू’ दर्जा वगळता उर्वरित शेतमाल शेतकऱ्यांना सरासरी किमान १४०० रुपये प्रति क्विंटल दराने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतमालाची किमान तीन वर्गवारी झाल्यास सध्या भावाची बाजारात होणारी ‘कत्तल’ थांबण्यास मोलाची मदत होणार आहे. खरेदीदारांना शासकीय खरेदी केंद्रांवर किरकोळ माल खरेदी केला जाऊन उर्वरित माल आपल्याच दावणीत येणार असल्याचे ठावूक आहे. सोयाबीन, उडीद, मूग खरेदीत सध्या तीन ग्रेड बाजारात अस्तित्वात नसल्यामुळे बाजारात सर्वच शेतमाल शेतकऱ्यांना सरासरी १४०० ते २००० रुपये प्रति क्विंटल तोटा सहन करून विकावा लागत आहे. दरम्यान सोमवारी सोयाबीनला किमान १४००, तर कमाल २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मुगाला ३५०० ते ४१००, उडदाला २९०० ते ३४६५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. नगण्य आवक असलेल्या जपानी भुईमुगाला किमान ४०००, तर कमाल ४८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. परंतु दुज्या भुईमुगाला किमान २५००, तर कमाल ३२५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारातील आवक शासकीय खरेदीचा ताळेंबद मांडला असता हमी भावाची ही खरेदी शेतकऱ्यांसाठी केवळ पानगळ झालेल्या झाडाची आभासी सावली ठरल्याचे दिसत आहे. 
बातम्या आणखी आहेत...