आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक नियोजनशून्यतेने शेतकरी आत्महत्यांत वाढ - पी. साईनाथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शेती, शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या हे या देशातील सर्वाधिक दुर्लक्षित विषय आहे. या विषयावर काेणीच काही बोलण्यास तयार नसतो. दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही कमी दाखवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असतात, असा अाराेप करतानाच आर्थिक नियोजनशून्यतेमुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे परखड मतही ख्यातनाम कृषी अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी रविवारी व्यक्त केले.

डाॅ. आंबेडकर अॅग्रीकोज असोसिएशन आॅफ इंडिया या संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘राजकारणात दिसून येणारी लोकशाही सामाजिक व आर्थिक क्षेत्रात दिसून येत नाही हा किती विपर्यास आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील वाढती असमानता राजकीय क्षेत्रात स्फोट घडविल्याशिवाय राहाणार नाही, असे डाॅ. आंबेडकर यांनी संविधान समितीसमोर म्हटले होते. त्यांचे हे विधान आजही तितकेच प्रासंगिक आहे’, असे पी. साईनाथ म्हणाले.

नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युरो शेतकरी आत्महत्या तसेच अपघात बळींचा अहवाल दरवर्षी सादर करते. ३० जूनला हा अहवाल यायला हवा. आज सप्टेंबरचा पंधरवडा उलटूनही अहवाल आलेला नाही. शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी कमी दाखवा असे केंद्र सरकारचे निर्देश आहे. याच कारणांमुळे शेतकरी, शेतमजूर, इतर अशी विभागवारी करण्यात आली. यात ‘इतर’चा रकाना दिवसेंदिवस वाढत चालला आहे, याकडे साईनाथ यांनी लक्ष वेधले.

मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष : मंजुळे : फालतू व थुकरट प्रश्नांमुळे मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागराज मंजुळे म्हणाले. लोकप्रतिनिधी उत्सवात दंग आहेत. संपूर्ण समाजच संवेदनाहीन झाला आहे. सत्य कोणालाच ऐकायचे नाही. वर्तमानपत्रेही अर्थहीन समस्या मांडत आहे. बहुतांश लोकांना वर्तमानपत्राबाहेरचे सत्यच माहित नाही. इतके भयाण वास्तव असताना ‘बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न’, हेच वर्तमानपत्रांतून छापून येते, याकडे मंजुळे यांनी लक्ष वेधले.

विशेष अधिवेशन हवे
शेतकऱ्यांच्या समस्या प्रामाणिकपणे सुटाव्या असे वाटत असेल तर केंद्र सरकारने संसदेचे दहा दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. या अधिवेशनात फक्त कृषी क्षेत्र, शेतकरी व आत्महत्या या विषयावरच चर्चा व्हावी, अशी मागणी साईनाथ यांनी केली. कोरडवाहू शेतीसाठी प्रामुख्याने नियोजन व्हावे, तसेच शेतीला सार्वजनिक उपक्रम म्हणून जाहीर करावे आदी मागण्याही त्यांनी केल्या.
बातम्या आणखी आहेत...