अमरावती- मेळघाटातील एका अभागी बापाला त्याच्या नवजात मृत मुलीला पुरण्यासाठी स्मशानभूमीत चार पट शुल्क मोजूनही स्वत:लाच खड्डा खोदावा लागला. यावर कहर म्हणजे रात्रीच्या अंधारात टॉर्च घेऊन उजेड दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यानेही त्याच्याकडून पैसे वसूल करून माणुसकी पुरती मेल्याचा पुरावाच दिला आहे. ही दुर्देवी घटना संबंधित युवकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अापबिती सांगीतल्यानंतर उघड झाली.
चंदन गणपत चव्हाण या अभागी आदिवासी बापाला नियतीने जुळी मुले दिली. एक मुलगा एक मुलगी. मुलगी अत्यवस्थ असल्यामुळे चंदन तिला उपचारासाठी नागपूरला घेऊन गेला. परंतु नवजात मुलीने अर्ध्यावरच दम तोडला. त्याच रुग्णवाहिकेत कोवळ्या कन्येला उराशी घेऊन चंदन माघारी फिरला. रात्री दहा वाजताच्या सुमारास टाकरखेडानजीक आल्यानंतर माणुसकी मेलेल्या रुग्णवाहिकेतील चालक सेवेचे व्रत घेतलेल्या परिचारिकेने चंदनला तान्हुलीच्या कलेवरसह रुग्णवाहिकेतून उतरून दिले. नवजात मुलीला पोटाशी धरून चंदनने रात्री दोन वाजताच्या सुमारास येथील हिंदू स्मशानभूमी गाठली. स्मशानभूमीत गेल्यावर तेथेही चंदनला माणुसकी मेलेला राक्षस भेटला.
अंत्यसंस्कारासाठी चारपट पैसे या कर्मचाऱ्याने वसूल केले. चंदनने स्वत:च मुलीसाठी खड्डा खोदला. िकर्रर्र अंधारात खड्डा खोदण्यासाठी बॅटरीचा उजेड दाखवण्यासाठीही चंदनकडून शंभर रुपये वसुल करण्यात आले. जगातील माणुसकीच्या तमाम भिंती गळून पडल्याचा अनुभव घेऊन मोडलेल्या चंदनने अखेर बुधवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालय गाठून काळीज कापणारी आपबिती त्यांना कथन केली.
मेळघाटातील धारणी तालुक्याच्या कुसुमकोट येथील रहिवासी चंदनने या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून न्यायाची मागणी केली.
ही गंभीर बाब, संचालकांकडे प्रकरण पाठवणार
डफरीन रुग्णालयातच बालकांची काळजी घेण्याची सर्व यंत्रणा असताना त्यांना कोणत्या कारणाने नागपुरात पाठवण्याचा िनर्णय घेण्यात आला हे माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे. मी सध्या मुंबईत असून अमरावतीत आल्यावर या प्रकरणी चोकशी करून हे प्रकरण थेट संचालकांकडे पाठवणार आहे.
- डाॅ. संजयवारे, वैद्यकीय अधीक्षक, डफरीन रुग्णालय
कारवाई करणारचं
याप्रकरणीजे दोषी आहेत त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाईल. हे गंभीर प्रकरण आहे. याची प्रशासनाने दखल घेतली असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, याकडेही लक्ष दिले जाईल.
- किरणगित्ते, जिल्हाधिकारी
खड्ड्यासाठी ४०० रु.
मृत नवजात बालिकेला रात्री वाजता शहरातील हिंदू स्मशान भूमीत घेऊन गेल्यानंतर आधी तर या आदिवासी बापाला तेथे चारपट शुल्क ४०० रु. द्यावे लागले. त्यानंतर त्याच्याच हातात खड्डा खोदण्यासाठी कुदळ, फावडा देण्यात आला. खड्डा खणत असताना हिंदू स्मशान भूमितील कर्मचाऱ्याने टाॅर्ज दाखविला म्हणून त्याच्याकडून १०० रु. वसूल केले.
केलेली खटपट व्यर्थ
माझ्या कुटुंबात मुलगी नव्हती. त्यानंतर जुळी मुलं झाली. त्यात एक मुलगा एक मुलगी होती. दोघांचीही प्रकृती वजन कमी अशक्त असल्याने नाजूक होती. त्यांना नागपूरला नेण्यात यावे, असा डाॅक्टरांनी सल्ला दिला. मुलासह मुलगी जगावी हीच माझी इच्छा होती. परंतु, मार्गातच मुलगी दगावल्याने माझी खटपट व्यर्थ ठरली अशी माहिती चंदन चव्हाण यांनी दिली आहे.