आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराचे बळी: नदीत कार बुडाली; कुटुंबातील चौघे ठार, अमरावती जिल्ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती जिल्ह्यातील बिलदोरी नदीपात्रात गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त कार दिसून आली. - Divya Marathi
अमरावती जिल्ह्यातील बिलदोरी नदीपात्रात गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त कार दिसून आली.
धामणगाव रेल्वे- कमी उंची असलेल्या अमरावती जिल्ह्यातील बिलदोरी नदीच्या पुलावरील पाण्याचा चालकाला अंदाज न आल्यामुळे कार बुडाली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. बुधवारी घडलेली ही घटना अंजनसिंगी- कौंडण्यपूर मार्गावर गुरुवारी सकाळी उघडकीस आली. संजय गोविंद आजनकर (वय ४६), दुर्गा ऊर्फ गायत्री गजानन आजनकर (३४), सानवी गजानन आजनकर (५) व गजानन गोविंद आजनकर (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत.

यवतमाळच्या महादेवनगरातील आजनकर कुटुंबीय बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अंजनसिंगी-कौंडण्यपूर मार्गाने वर्धामणेरी येथे भाच्याच्या लग्नासाठी कारने जात होते. दरम्यान, बिलदोरी नदीवरील पुलावरून जात असताना चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची कार नदीपात्रात वाहून गेली. यात चाैघांचाही मृत्यू झाला.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बिलदोरी नदीला पूर आला होता. त्यातच निम्न वर्धा प्रकल्पातील बॅक वॉटरने हा कमी उंचीचा पूल पाण्याखाली बुडाला होता. गुरुवारी सकाळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांना ही कार पाण्यात आढळून आली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्वरित घटनेची माहिती कुर्हा पोलिस ठाणे व तहसीलदार विजय लोखंडे यांना दिली. सकाळी आठ वाजताच्या सुमारास पोलिस पोहोचल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. त्यातील चारही मृतदेह काढून चांदूर रेल्वे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

कार चोवीस तास पाण्याखाली : बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास कार पुलावरून पाण्याखाली गेली. दरम्यान, पुरामुळे दिवसभर कार दिसू शकली नाही. गुरुवारी पहाटे पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांना ही कार आढळून आली.

संपर्क झालाच नाही : लग्नास आजनकर न पोहोचल्यामुळे नातेवाइकांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा बुधवारी दिवसभर प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे बुधवारीच त्यांनी पोलिसांना हे चौघे बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. नातेवाइक व पोलिसांकडून आजनकर कुटुंबीयांचा शोध घेणे सुरू होते.

रिसेप्शनवर शोककळा : चांदूर रेल्वे येथील गणेश होले याचे लग्न बुधवारी होते. भाच्याच्या लग्नासाठी गायत्री आजनकर कुटुंबीयांसोबत जात होत्या, परंतु दुपारी तीन वाजेपर्यंत मुलाची मावशी न आल्यामुळे नातेवाईक चिंतेत होते. गुरुवारी मुलाच्या रिसेप्शनची तयारी चांदूर रेल्वे येथे सुरू होती. त्यातच चारही मृतदेह येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्याने कुटुबीय शोकसागरात बुडाले.

सिन्नरमध्येही कार बुडाली, महिला ठार
डोहाळजेवण कार्यक्रम संपवून पुण्याकडे जाणारी कार शहरातील संगमनेर नाक्याजवळील पुलाच्या कठड्यास धडक देऊन नदीत कोसळल्याने पुण्याची महिला ठार झाली. कारचालकासह अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. सिन्नरच्या युवकांनी बुडणाऱ्या कारच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बुधवारी रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेली करिष्मा उज्ज्वल येवलेकर (४५) यांचे नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचा मुलगा जय उज्ज्वल येवलेकर (२३) यांच्यासह संगीता प्रशांत खरोटे (४०) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.
नदीपात्रातील पाणवेली आणि अंधारामुळे कार पाण्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना अडथळा आला. त्यामुळे गुरुवारी सकाळी क्रेनच्या साहाय्याने ती बाहेर काढण्यात आली. महिलांचे कारमध्ये पडलेले दागिने पोलिसांनी नातेवाइकांकडे सुपूर्द केले.

मुळा धरण ४८%, तर भंडारदरा ७५% भरले
नगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने या दोन्ही धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. २६००० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणाचा साठा १२३८० दशलक्ष घनफुट (४८ टक्के), तर ११०३९ दशलक्ष घनफुट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८२०६ दशलक्ष घनफुट (७५ टक्के) झाला आहे. शुक्रवारपर्यंत मुळा धरण ५० टक्के भरण्याची शक्यता अाहे.

‘निळवंडे’चा साठा
निळवंडे धरणात चार हजार ३८१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीचा गुरुवारी सायंकाळी वाकी येथील विसर्ग २९३ क्युसेक होता. एक हजार सात दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणातही ७२३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. हे धरण ७५ टक्के भरले आहे.

गंगापूर धरणात ६७ टक्के
जिल्ह्यातील गंगापूर धरण समूहाचा जलसाठा ६७ टक्क्यांवर गेला अाहे. या धरणात सध्या ५,१५२ दलघनफूट साठा आहे. मागील अाठवड्यात झालेल्या पावसामुळे समाधानकारक चित्र निर्माण झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही १५ टक्के साठा कमी अाहे. दारणा धरणात ७५ टक्के तर पालखेड धरणात २९ टक्के पाणी अाहे.

कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पाऊस कमी
मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मात्र, आता हे कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पाऊस कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शुक्रवार आणि शनिवारी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.