आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली जिल्ह्यात पूर; 100 गावांचा संपर्क तुटला, एक जण वाहून गेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील बाजारपेठ व निवासी घरे पाण्याखाली बुडाली. परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. देसाईगंज येथे मासेमारी करण्यासाठी गेलेला एक मासेमार नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे २१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून २१२६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.  
 
गेल्या २४ तासांत गडचिरोली येथे १२२.६ मिमी, चामोर्शी २६३.२ मिमी, मूलचेरा १२०.६ मिमी, धानोरा ८३.१, आरमोरी ९०.३, सिरोंचा ५७.३, एटापल्ली १३०.६ मिमी, अहेरी १२५.५ मिमी तर भामरागड तालुक्यात विक्रमी ३४२.२ मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवार रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागडनजीकच्या वैलोचना नदीला पूर आल्याने वैरागड-मानापूर मार्ग बंद आहे. आरमोरी-गडचिरोली मार्गावरील गाढवी व खोब्रागडी या नद्याही फुगल्या आहेत. कुरखेडा तालुक्यातील सती नदीतील पाण्याची पातळी वाढली असून, अनेक नाले ओसंडून वाहत आहेत. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरून ५ ते ६ फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मंगळवारी भामरागड येथे मुक्कामी गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस तेथेच थांबल्या आहेत. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने अर्धी बाजारपेठ पाण्यात बुडाली आहे. गेल्या चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ३४२.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गडचिरोलीनजीकच्या कठाणी नदीलाही पूर आला असून, पुराचे पाणी पुलाखाली ५ फुटांपर्यंत आले आहे.  

दरम्यान, बुधवारी सकाळी देसाईगंज येथील विनोद शंकर कांबळे (३५) हा  रेल्वे पुलाखालील नाल्यावरील पुरात वाहून गेला.

काेल्हापुरात मुसळधार पाऊस; पंचगंगेचे पाणी नदीपात्राबाहेर
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून पंचगंगेचे पाणी या पावसाळ्यात पहिल्यांदा पात्राबाहेर पडले आहे. जिल्ह्यातील भोगावती आणि पंचगंगा नदीपात्रात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरण ७० टक्के भरले अाहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७०६ मिमी पावसाची नाेंद झाली.  

पंचगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी ३१.५ फुटांवर गेली आहे. जिल्ह्यातील एकूण ४१ बंधारे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी वाहतुकीचे रस्ते पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे.  

गेल्या २४ तासांत हातकणंगलेत १९.४५ मिमी, शिराेळ ११.७१ मिमी, पन्हाळा ४८.२८ मिमी, शाहूवाडी ५३.६७ मिमी, राधानगरी ८१.५० मिमी, गगनबावडा १२५.५० मिमी, कागल ६७ मिमी, गडहिंग्लज ४२.५७ मिमी, भुदरगड ५१.६० मिमी, अाजरा, ७०.२५ मिमी, चंदगड ९४ मिमी पावसाची नाेंद झाली.   तळकाेकणातही गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जाेर कायम अाहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३६.८८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात १५७४.५४ मिमी पाऊस झाला अाहे. रत्नागिरी जिल्ह्यातही संततधार कायम हाेती.

नाशिक जिल्ह्यात देव नदीपात्रात पूरपरिस्थिती
जिल्ह्यातील सप्तशृंग गड, मार्कंडेश्वर डोंगर परिसर, अहिवंतवाडी डोंगर, चामदरी, पायरपाडा, चंडिकापूर, मांदाणे, भातोडे तसेच वणी परिसरात बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे देव नदीला पूर अाला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...