आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीक मागणाऱ्या मुलांसाठी फुटपाथ शाळा, डॉक्टर, इंजिनिअर शिकवतात फुटपाथवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- उन्हाळ्यातील कमालीचे तापमान किंवा हिवाळ्यातील कुडकुडत्या थंडीतही शहरातील अनेक सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांमध्ये साक्षरतेचा प्रसार करण्याचा वसा नागपुरात फुटपाथ शाळांनी घेतला आहे. व्यवसायाने डॉक्टर, इंजिनिअर, कॉलेज विद्यार्थी, प्राध्यापक अशा वर्गातील लोक शक्य तेवढा वेळ देऊन चक्क फुटपाथवर या मुलांना शिकवताना दिसत आहेत.
नागपुरातील चौकांत वाहतूक सिग्नलवर लहान मुले भीक मागताना दिसतात. साक्षरतेचा प्रसार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणता आणण्याच्या विचाराने सामाजिक कार्यकर्ते वरुण श्रीवास्तव यांनी उपाय या स्वयंसेवी संस्थेतर्फे फुटपाथ शाळा सुरू केल्या.

८४ मुले घेतात शिक्षण : मुलांशी संवाद साधतो तेव्हा त्यांना भीक मागणे आवडत नाही. पालकच त्यांना प्रोत्साहित करतात, असा वरुण यांचा अनुभव आहे. या मुलांना शाळेत आणणे मोठे आव्हान आहे. सुमारे ८४ मुले फुटपाथवर शिक्षण घेत आहेत.

२५ जणांची टीम, चार शाळा, ८४ विद्यार्थी
एलआयसी चौक, यशवंत स्टेडियम, उत्तर अंबाझरी मार्गावर अमृत भवनच्या पुढे व सदर भागात माउंट रोडवर ८ महिन्यांपूर्वी फुटपाथ शाळा सुरू झाल्या. त्यासाठी २० ते २५ कार्यकर्त्यांची टीम आहे. मुलांना खाऊचे आमिष दाखवून फुटपाथवर गोळा केले जाते. गोष्टी सांगून जमेल ते शिकवण्याचे प्रयत्न होतात. मुले प्रतिसादही देतात. त्यांना सवय झाल्यावर हिंदी, मराठीची बाराखडी, एबीसीडी, सोपे गणित, हिंदी-इंग्रजी कविता शिकवल्या जातात. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत चालणाऱ्या या शाळांत शिक्षक म्हणून डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, माजी शिक्षक, विद्यार्थी कार्यकर्ते असतात. ८४ विद्यार्थी या उपक्रमात शिक्षण घेतात.

पालकांकडून होते मारहाण
अनेकदा आमच्या कार्यकर्त्यांना मुलांच्या पालकांकडून मारहाण, शिवीगाळ होण्याचे प्रकारही होतात, पण आम्ही धीर सोडला नाही. शक्य तेवढ्या मुलांना शाळेत आणायचा प्रयत्न आहे. शहरात आणखी शाळा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
- वरुण श्रीवास्तव, उपाय संस्था

मुले परिसर बदलतात-
मुलांना लळा लावण्याचे प्रयत्न असतात. पण पालकांच्या नाराजीमुळे मुले अचानक परिसर बदलतात. अशा वेळी परिश्रम वाया गेल्याची भावना होते. - डाॅ. कामायनी देशपांडे, शिक्षिका
बातम्या आणखी आहेत...