आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळाचे कामकाज अंतिम टप्प्यात : संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका आणि विरोधकांकडून सादर होणारा अंतिम आठवडा प्रस्ताव या दोन प्रमुख विषयांवर होणाऱ्या चर्चा वगळता विधिमंडळाचे ७० टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात नोटाबंदी, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, अॅट्रॉसिटी कायदा या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. तर पहिल्याच आठवड्यात महत्त्वाची अनेक विधेयके पारित झाली आहेत. मागील आठवड्यात शासकीय कामकाज उत्तम झाले, अशी प्रतिक्रिया संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
राज्य सरकारने ठरवलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा क्रम पार पडला, असेही तावडेंनी सांगितले. अधिवेशनाच्या अंतिम टप्प्यात पुढील चार दिवसांच्या कालावधीत चार ते पाच विधेयके सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती तावडे यांनी दिली. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज १७ डिसेंबरला संपणार असल्याचे मंगळवारी निश्चित झाले आहे. नागपुरातील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे कामकाज १७ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आले होते. या वर्षी दोनच आठवड्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. शुक्रवारी १६ डिसेंबरला होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम आठवड्याच्या कामकाजाविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत असताना विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेकडे आता सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, बुधवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामुळे विधिमंडळात काही प्रमाणातच कामकाज होण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे शनिवारी अधिवेशनाचे कामकाज संपण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...