आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्यांनी’ सजवला दहाव्या निराधार मुलीचा संसार, निराधारांना आधार देताना गजानन जाधव झाले बाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मुलींचे लग्न म्हटले की, जनसामान्य बापाच्या छातीवर दगड असल्याचीच भावना आजही समाजात काही ठिकाणी आहे. समाजातील हीच दु:खाची नाळ पकडून निराधार, अनाथ मुलींचे संसार फुलवण्याचे सामाजिक काम कोणतीही अपेक्षा बाळगता परिस्थितीचे चटके खाल्लेले गजानन जाधव करत आहे. गजाननरावांनी २००७ पासून निराधार अनाथ असलेल्या १० मुलींचे वडिलांच्या भूमिकेतून लग्न लावून दिले आहे. दहाव्या मुलींचे लग्न त्यांनी नुकतेच लावले आहे.
गजानन जाधव हे गर्भश्रीमंत नाही किंवा त्यांची कोणतीही सामाजिक संस्था नाही. स्वत: अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून ते पुढे आले आहे. स्वत:चे शिक्षण दुसऱ्याकडे कष्ट करून पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. मागील पंधरा वर्षांपासून ते कॅटरिंगचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून येणाऱ्या पैशातून आपला संसाराचा गाडा चालवून त्यांच्या संपर्कात आलेल्या निराधार अनाथ मुलींचे पालनपोषणही त्यांनी केले आहे. इतकेच नाही तर त्या मुलींचा धडाक्यात विवाह लावून देण्याची जबाबदारीसुद्धा ते खंबीरपणे घेऊन यशस्वीपणे पूर्ण करतात. त्यांंनी नऊ वर्षांत दहा मुलींचे विवाह लावून दिले आहेत. त्या मुली आपआपल्या सासरी सुखात आहेत. यामध्ये चार अनाथ मुलींचा तर सहा निराधार मुलींचा समावेश आहे. स्वत.ला मिळणाऱ्या थोड्या अधिक मिळकतीमधून असे महान कार्य करणारा हा माणूस खरंच ‘ग्रेट’ आहे.

पहिले लग्न लावले होते मंदिरात
गजानन जाधव यांनी सन २००७ मध्ये पहिल्यांदा निराधार मुलीचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. गजाननरावांकडे फार काही मालमत्ता किंवा गडगंज संपत्ती नाही की, ते प्रत्येक मुलीचा विवाह मंगल कार्यालय घेऊन पूर्ण करतील. त्यांनी आपल्या काही मित्रांच्या मदतीने कोंडेश्वर मंदिरात पहिला विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर लग्न याचप्रकारे विविध मंदिरे मैदानांवर पार पाडली. आता मात्र त्यांनी तपोवन परिसरात स्वत:चे मंगल कार्यालय बांधले आहे.
कुटुंबीयांची मित्रांची अमूल्य साथ
गजानन जाधव यांच्या कुटुंबात वडील भास्करराव, आई जानकी, पत्नी प्रमिला, मुले नेताजी आकाश आहेत. या सर्व सदस्यांनी गजाननरावांना नेहमी सकारात्मक साथ दिली. त्यामुळेच आतापर्यंत सर्व सोहळे आनंदात पार पडले. अशा कामासाठी कुटुंबातील सदस्यसुद्धा कधीच आपल्याला थांबवत नाही उलट उत्स्फूर्तपणे साथ देतात, सोबतच सहकार्य करण्यासाठी मित्र अॅड. राजेश बतरा, संजय बाळापुरे, र्इश्वरआप्पा मुंजाळे, गजूआप्पा बाहेनकर, प्रवीण घरडीनकर, जितू झटाले, ठुसे काका, अशोक विरुळकर, राजू सोळंके इतर मित्रमंडळीची मदत आधार महत्त्वाचा असल्याचे गजानन जाधव यांनी सांगितले.

असे घडले गजानन जाधव
गजाननजाधव हे मूळचे वाशीम येथील रहिवासी आहेत. वीस वर्षांपूर्वी ते शिक्षणासाठी अमरावतीत आले. स्वत:ची सायकल घेण्याची परिस्थिती नव्हती. त्या वेळी एका अधिकाऱ्याने सायकल घेण्यासाठी ३०० रुपये दिले. हे तीनशे रुपये परत करण्याची परिस्थिती नव्हती. त्यामुळे सहा महिने त्या व्यक्तीच्या घरातील साफसफाईचे काम केले. अशातच पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर एका मेसवर काम सुरू केले. त्याचठिकाणी स्वयंपाक बनवणे शिकले, नोकरी लागल्यामुळे स्वयंपाक कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला. आता त्याच व्यवसायात स्थिरावले आणि त्यामधूनच स्वत:सोबत दुसऱ्यांसाठी जे चांगले करता येईल, तेच सातत्याने करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...