आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या ‘कोटी-कोटी’ प्रेमाने ‘कोमल’ खांद्यावर कचऱ्याचा भार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तीन वर्षांपुर्वी कचरा उचलण्याचे कंत्राट संपल्यानंतरही मागील आठ वर्षांपासून मनपाचा एकच कंत्राटदार शहरातील घनकचरा उचलत अाहे. दरवर्षी सुमारे दहा कोटी रुपयेे खर्च असलेल्या या कचऱ्याचा भार मनपा प्रशासनाच्या ‘कोटी-कोटी’ प्रेमामुळे एकाच ‘कोमल’ खांद्यांवर टाकला जात असल्याने या कंत्राटात पाणी मुरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरातील घन कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी म्हणून महापालिका प्रशासनाने एजन्सी नियुक्त केली आहे. पूजा कंस्ट्रक्शन असे शहरातील घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराने नाव आहे. महापालिका क्षेत्रातील घनकचरा उचलून कंपोस्ट डेपो येथे टाकण्याचा पाच वर्षांचे कंत्राट पूजा कंस्ट्रक्शन कंपनीला सप्टेंबर २००८ मध्ये देण्यात आले.

शहरातील घनकचरा उचलण्याचे कंत्राट सप्टेंबर २०१३ मध्ये संपुष्टात आले. त्यानंतर नवीन कंत्राटदार नियुक्त करण्याऐवजी पूजा कंस्ट्रक्शनला तीन वर्षात दोन वेळ मुदतवाढ देण्यात आली. मागील वर्षी देण्यात आलेली मुदतवाढ १४ सप्टेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत आहे. मात्र नवीन निविदा प्रक्रिया राबवित अद्याप नव्याने कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली नाही. मुदतवाढ संपुष्टात येण्यास केवळ दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना नवीन कंत्राटाराची नियुक्ती झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मागील वर्षी मुदत संपुष्टात येण्याचा कमी कालावधी शिल्लक असताना निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती, मात्र योग्य प्रस्ताव आल्याने ती रद्द करीत पूजा कंस्ट्रक्शनला मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढ संपण्याच्या ऐनवेळेस प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील वर्षी प्रमाणे यावेळेस देखील मुदतवाढ तर दिली जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शहराच्या अनेक भागात कचरा साचून राहत असल्याने कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

शहराच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात दररोज कचरा निघत असून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया महापालिकेला करणे गरजेचे आहे. मात्र महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याची बाब दोन दिवसांपूर्वी आलेल्या नाल्यांच्या पुरामुळे समोर आली. नाल्याला आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात कचरा वाहून वाहुन आला. त्यामुळे शहरातील घरकचऱ्याची योग्य प्रमाणात उचल होत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. अनेक भागात असलेले कंटेनर देखील अनेक दिवसांपर्यंत तसेच पडून राहत असल्याचे आरोग्याची समस्या गंभीर होण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

स्वतंत्रधोरण नाही
महापालिकेत घनकचरा व्यवस्थापनाचे स्वतंत्र धोरण नसल्याची बाब समोर अाली आहे. स्वतंत्र धोरण करता यावी म्हणून कचरा उचलण्याच्या कंत्राटास मुदतवाढ देण्यात आली. मात्र धाेरणाच्या प्रशासकीय विषयावर २०१४ मध्ये दोन ते तीन सर्वसाधारण सभेत चर्चा देखील करण्यात आली. स्वतंत्र असे धोरण समोर आले नसल्याचे चित्र आहे.

कंपोस्टडेपो ओव्हरफ्लो
सुकळी येथे असलेला कंपोस्ट डेपो ओव्हरफ्लो झाला असल्याचे दिसून येत आहे. २५ ते ३० वर्षांपासून येथे शहरातील घनकचरा टाकल्या जात आहे. प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने शहरातून दररोज निघणारा २०० मेट्रिक टन कचरा यावर साचत आहे. सध्यस्थितीत ९.३८ हेक्टर क्षेत्रातील कंपाेस्ट डेपो कमी पडत आहे.

दृष्टीक्षेपात स्वच्छता विभाग
प्रकार संख्या
निळे कंटेनर २५०
पिवळे कंटेनर ६०
घंटी कटले ३४३
हायड्रॉलिक ऑटो ४३
ट्रक ४०
कॉम्पॅक्टर ०२

नव्याने मुदतवाढ दिली जाणार नाही
^शहरातील कचरा उचलण्यासाठी असलेल्या कंत्राटदारास मुदतवाढ दिली जाणार नाही. नव्याने कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्वीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. हेमंत पवार, आयुक्त,मनपा.

शहरातून रोज दोनशे मेट्रिक टन कचरा
शहरातून दररोज २०० मेट्रिक टन घनकचरा निघतो. दोनशे मेट्रिक टन कचरा उचलण्याची कसरत दररोज महापालिकेला करावी लागते. त्याकरिता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. मात्र वर्षाला १० कोटी खर्चून देखील कचरा कायम राहत असल्याने कंत्राटावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...