नागपूर- ‘गौरवला शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे. तो हयात असता तर या वेळी आमच्यासोबत असता. आमच्यासाठी त्यानं आपला जीव गमावला. तो येथे नाही याचं आम्हाला खूप वाईट वाटतंय…’ मरणाेत्तर राष्ट्रीय बालशाैर्य पुरस्कार जाहीर झालेल्या नागपुरातील गाैरव सहस्रबुद्धे याने ज्या मित्रांना वाचवले त्यापैकी सर्वात माेठा १९ वर्षीय त्रिरत्न गेडामने अतिशय जड अंत:करणाने ‘दिव्य मराठी’कडे अापल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांच्या ताेंडून तर शब्दच फुटत नव्हते.
नागपुरातील अंबाझरी तलावात बुडत असलेल्या आपल्या चार मित्रांना वाचवताना स्वत:चे प्राण गमावणाऱ्या गौरवला मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ३ जून २०१४ रोजीची ही घटना. शुभम सुटे (१५), साकेत पिल्लेवान (१६), स्वप्निल भुरे (१६) आणि त्रिरत्न गेडाम (१९) हे गौरवचे मित्र उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने तलावावर पोहायला गेले होते. गौरव त्यांच्या मागाहून पोहोचला. तेथे पोहोचताच त्याला चौघेही बुडत असल्याचे दिसले. गौरवने लगेच तलावात उडी घेतली. चौघांनाही सुखरूप बाहेर काढताना थकलेला गौरव तलावातच गडप झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
‘गौरवने केव्हा उडी मारली आम्हाला कळलेच नाही. आमच्यासाठी त्याने स्वत:च्या प्राणाची बाजी लावली. तो आमचा सच्चा मित्र होता,’ असेही त्रिरत्न हुंदका आवरतच म्हणाला. त्या घटनेचा गौरवच्या मित्रांच्या मनावर असा काही परिणाम झाला की ते मागील दीड वर्षात तलावाकडे फिरकलेदेखील नाहीत. गौरव दहावीत होता. या घटनेनंतर पंधरा दिवसांनी निकाल लागून त्यात गौरव प्रथम श्रेणीत पास झाल्याचे आढळून आले, असे गौरवला शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज सिरिया यांनी सांगितले.
भाऊ नि:शब्द
गौरवचे वडील कवडू हे सुतारकाम, तर आई घरकाम करते. मोठा भाऊ नीलेश गॅरेजमध्ये काम करतो. गौरवला शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कुटुंबीयांना आठवडाभरापूर्वीच कळवण्यात आली. त्यानुसार गौरवचे वडील कवडू व आई रेखा शुक्रवारीच दहा दिवसांसाठी दिल्लीला रवाना झाले. मुलाच्या वतीने पुरस्काराचा स्वीकार करूनच ते परतणार आहेत. त्यामुळे घरी एकटाच असलेला मोठा भाऊ नीलेशच्या भावना अनावर झाल्या होत्या. तो काहीच बोलू शकला नाही.