खामगाव - जगातील१६ देशांच्या भ्रमणासाठी निघालेल्या जर्मनी येथील गेरी मायर या विदेशी पर्यटकाच्या वाहनावर लावलेला जीपीआरएस (मार्गदर्शक यंत्र) अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना २० जानेवारीच्या रात्री संजीवनी कॉलनीत घडली. गिनीज बुकमध्ये नावाची नोंद असलेले जर्मनीतील गेरी मायर वय ४० हा विदेशी नागरिक सध्या नवा विक्रम करण्यासाठी १६ देशांच्या भ्रमणासाठी निघालेला आहे. इराक, इराण आणि पाकिस्तानचा दौरा करून तो नुकताच भारतात दाखल झाला आहे. मुंबईत प्रवेश करून ते त्यांची विदेशी वाहन क्रमांक केएन १६६ ने कलकत्ताकडे निघाले होते. बुधवारी सायंकाळी खामगावमध्ये पोहोचले असता नांदुरा मार्गावरील लाबेला हॉटेलजवळ त्यांच्या वाहनाची एक्सेलेटर वायर तुटली. या वेळी शहरातील संजीवनी कॉलनीतील मोहन तायडे या तंत्रज्ञाने थांबून त्यांची मदत केली.
तायडेंनी त्यांची विचारपूस करून घरी येण्याचे निमंत्रण दिले. घरी आल्यानंतर त्याला पाहुणचार करून अतिथी देवो भवचा प्रत्यय दिला. मायर रात्री तायडे यांच्या घरी मुक्कामी असल्याने त्यांचे वाहन घराबाहेर उभे केले. दरम्यान रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या वाहनावरील मार्गदर्शक यंत्र चोरून नेले. ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या यंत्रामध्ये विदेशी नागरिकांची माहिती, नकाशे आणि डाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यंत्राच्या संकेतस्थळानुसार ते देशभर भ्रमण करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिस चोरट्याचा शोध घेत आहे. विदेशी पर्यटकाची वस्तू चाेरीस गेल्यामुळे भारताचे, महाराष्ट्राचे त्यातच बुलडाणा जिल्ह्याचे खामगावचे नाव चोरट्याने खराब केले आहे. बाहेर देशातून भारतात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सेवा, सुरक्षासाठी प्रशासनाने विशेष पाऊल उचलले आहे. वेगवेगळ्या जाहिरातीतून अतुल्य भारत अभियानाच्या माध्यमातून अतिथी देवाे भवचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे. मात्र, खामगाव शहरात दाखल झालेल्या या विदेशी पर्यटकाच्या यंत्राची चोरी करून खामगावकरांचे नाक कापल्या गेले आहे.