अमरावती - जिल्ह्यात शेततळ्यांना चालना देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून मागेल त्याला शेततळे योजनेसाठी आता शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम रक्कम देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात जलसंधारण होऊन शेतकऱ्यांना हंगामी सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने शेततळ्यांची योजना राबवण्यात येत आहे. शेततळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आले अाहे.
शेततळ्यांची कामे मंजुर करून तसेच आखणी करूनही ते पूर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याबाबत कारणमिमांसा करण्यात आली असता ही कामे पूर्ण करताना लाभ्यार्थ्यांकडून जेसीबी धारकांना निधी मिळण्याची हमी नसल्याने कामे ठप्प पडली असल्याचे शासनाच्या ध्यानात आले. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यातून कृषी सहायकाच्या साक्षीने निधी थेट मशीन धारकाच्या खात्यावर जमा झाल्यास कामे गतीने पूर्ण होतील. म्हणून शेतकऱ्यांना शेततळी लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होण्याच्या दृष्टीने मशीन धारकांना काम पूर्ण झाल्यावर तत्काळ निधी मिळावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.