आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तान्हुलीला जिवंत जाळले, मृतदेह नदीकाठी फेकला- अमरावतीच्या परतवाडानजीकची घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा (जि. अमरावती) - जेमतेम एका महिन्याची निशाणी. कुणाशी तिचं काय वैर असू शकतं? पण वैरी माणुसकीचा होता. त्यानं या लुसलुसत्या गोळ्याला जिवंत जाळलं आणि तिचा निष्प्राण देह नदीकाठी फेकून दिला. आणखी एक निशाणी मिटली. परतवाड्यानजिकच्या या घटनेनं मेंदू बधिर झालेत.

मुलींच्या सुंदर आयुष्यासाठी अपार कष्ट वेचणाऱ्या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा जयघोष विरलाही नव्हता की, महिनाभराच्या निशाणीच्या आर्त किंकाळ्या त्यात मिसळल्या. परतवाडालगतच्या गौरखेडा कुंभी या गावात सोमवारी (दि. ४) सायंकाळी हे सैतानी कृत्य उघडकीस आले. स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या समाजातच कोवळ्या कळीचा कोळसा करणारे कसायीदेखील वावरतात हेच ही घटना अधोरेखीत करते.

कुंभी गौरखेडा या गावातील गोकूळ बाळू वाकोडे निकिता गोकूळ वाकोडे यांची ही दुर्देैवी तान्हुली. निशाणी नावाची ही छोटी परी जेमतेम महिनाभरापूर्वीच जगात अवतरली. जगरहाटीचा एक चेहरा अत्यंत क्रूर असतो हे त्या बापडीला कसे ठाऊक? जगरहाटी समजण्याचे तिचे वयही नव्हते. तीन वर्षांची मोठी बहीण स्वराणी ती मोठी होऊ शकली नाही. तिचे प्रारब्ध काही औरच होते. कोवळ्या देहावर आगीचे चटके झेलण्याचे, मरणांत वेदना सहन करण्याचे... सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गावातून गेलेल्या बिच्छन नदीच्या पात्राजवळ बघ्यांची गर्दी जमली. गोकूळ वाकोडे यांचे मामा प्रल्हाद श्रीरामजी नेतनराव (४२) हेही गेले. तेथे एका खड्ड्यात तान्हुलीचा अर्धवट जळालेला निष्प्राण देह होता. तो गोकूळ यांची मुलगी निशाणीचाच असल्याचे नेतनराव यांनी ओळखले. त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती दिली परतवाडा पोलिसांनाही कळवले. पोलिसांनी तातडीने अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. परतवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिनाभराच्या चिमुकलीला कोणी जाळले, का जाळले, असे अनेक प्रश्न आहेत. गुन्हेगार कोण याचा शोध पोलिस घेतीलच. संपूर्ण परतवाडा शहर हळहळले. पोलिसांचे पथक उशिरा रात्रीपर्यंत गाैरखेडा कुंभी या गावात होते