आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कचेरीवर धडकली शेकडो मालवाहू वाहने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना असलेल्या वाहनधारकांकडून विविध ठिकाणांवरून माल वाहून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष माल वाहून नेण्याची परवानगी असलेल्या वाहनांच्या रोजगारावर मात्र यामुळे गदा येऊन त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणासंदर्भात तातडीने उपाययोजना करून तोडगा काढावा, या प्रमुख मागणीसाठी शेकडो मालवाहू वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांसह गुरुवारी दुपारी मोर्चा काढून जिल्हा कचेरीवर धडक दिली. या वेळी मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
या वेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार यवतमाळ शहरात प्रवासी ऑटो, अॅपे, मिनीडोर, टाटा मॅजिक, काळी-पिवळी अशा वाहनांना प्रवासी वाहून नेण्याचा परवाना देण्यात आलेला आहे. असे असतानाही ते फळांच्या डाग, भाजीचे कट्टे, धान्याचा माल अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूकही ही वाहने करत आहेत. त्याचप्रमाणे शहरातील काही पॅसेंजर ऑटोचालक हे प्रवासी वाहून नेता त्यांच्या वाहनाचा वापर केवळ माल वाहतूक करण्यासाठीच करतात. त्यात टीनपत्रे, प्लायवूड, हार्डवेअरचे सामान, सनमायका शिट्स, तेलाचे पिंप, धान्याचे पोते, ताट्या, दिवाण, कपाट अशा प्रकारच्या साहित्यांची वाहतूक ते आपल्या प्रवासी वाहतूक परवाना असलेल्या वाहनांमधून करतात. त्यात त्यांना दुप्पट कमाईही होत आहे. मात्र, प्रवासी वाहनांमधून होत असलेल्या या माल वाहतुकीमुळे प्रत्यक्षात माल वाहतुकीचा परवाना असलेल्या वाहनांच्या चालकांना काम मिळेनासे झाले आहे. त्याचा फटका बसून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येत आहे. वाहनाचा हप्ताही भरणे कठीण होत आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मालवाहू वाहनचालकांनी भव्य मोर्चा काढून गुरुवारी दुपारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. विठ्ठलराव धानोरकर आणि विष्णू कुळसंगे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला हा मोर्चा शहरातील विविध भागांत फिरून कचेरीवर धडकला. या वेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या या मनमर्जी कारभारावर अंकुश लावून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली. असे झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये जिल्हाभरातील माल वाहतूक परवानाधारक आपल्या वाहनांसह सहभागी झाले होते.
शासनाने दखल घेण्याची केली मागणी
प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना असलेल्या वाहनधारकांकडून विविध ठिकाणांवरून माल वाहून नेण्याचे प्रकार सध्या सर्रास सुरू आहेत. वास्तविक हा प्रकार बंद होण्याची गरज असताना संबंधित यंत्रणा यामध्ये फारसे लक्ष घालत नाही मात्र याचा फटका केवळ माल वाहतुकीचा परवाना असलेल्या वाहनचालकांना बसतो. त्यांना प्रवाशी वाहतूक करता येत नाही आणि मालही मिळत नाही अशा दुहेरी कात्रीत ते अडकल्याने यामध्ये शासनाने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मोर्चाद्वारे वाहनांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर येताना वाहनचालक.
बातम्या आणखी आहेत...