आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपनिरीक्षकाला मारहाण: शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची सक्तमजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/मुंबई- पाच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवून पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण  केल्या प्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी दोन कलमांन्वये प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ५ जानेवारी २०११ रोजी वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी आणि नंतर येथील पर्यटन केंद्रामध्ये आयोजित शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. तेव्हा विरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे खुलताबाद ईदगाह टी पाॅइंटजवळ वाहतूक नियमन करत होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा वेरूळ लेणी पाहून पर्यटन केंद्राकडे निघाल्याने टी पाॅइंटजवळ वाहतूक थांबवण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबाकडून एक फॉर्च्युनर गाडी आली. ही गाडी स्वत: आमदार जाधव चालवत होते. गाडीमध्ये तत्कालीन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील बनकर व वाहनचालक संतोष जाधव होते. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आमदार जाधव यांनी न थांबता सहायक पोलिस निरीक्षक कोकणे यांच्या अंगावर गाडी घातली. मात्र, प्रसंगावधान राखत कोकणे यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेऊन जीव वाचवला. त्यानंतर सुसाट वेगाने आमदार जाधव हे वेरूळच्या दिशेने निघाले, कोकणे यांनी तातडीने वायरलेसवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली व त्यांचा पाठलाग सुरू केला.

पुढे वेरूळ लेणीसमोरील महावीर स्तंभाजवळ दुसऱ्या अधिकाऱ्यांनी आमदार जाधव यांची गाडी अडवली. पाठलाग करणारे सहायक निरीक्षक कोकणे हेही त्या ठिकाणी पोहोचले. त्या वेळी गाडीतून उतरत आमदार जाधव यांनी “मी आमदार आहे, ओळखत नाही काय’, असे म्हणत शिवीगाळ केली व कोकणे यांना मारहाण केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी कोकणे यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपास करून १० मार्च २०११ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

अपील करण्यासाठी महिन्याचा अवधी
सहायक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी नऊ जणांच्या साक्षी नोंदवल्या. सुनावणीनंतर न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरून कलम २५२ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व कलम २३२ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. न्यायालयाने दिलीप पाटील बनकर व संतोष जाधव यांना निर्दोष मुक्त केले. शिक्षा सुनावल्यानंतर आमदार जाधव यांनी तत्काळ दंडाची दहा हजाराची रक्कम भरली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी म्हणून शिक्षेला एक महिन्याची स्थगिती दिली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून #SuperFastMaharashtra मधील बातम्यांवर टाका एक नजर....
-पाण्याच्या मोटरचा शॉक लागून मायलेकाचा मृत्यू
-चंद्रपुरात मालगाडीचे 16 डबे घसरले, वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...