आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेव जानकरांमुळे सरकार पेचात, हिवाळी अधिवेशनात विरोधकांची कोंडीत पकडण्याची रणनीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नोटबंदी आणि मराठा आरक्षणावर सरकारची कोंडी करण्यात अपयशी ठरलेले विरोधक आता पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. गुन्हे दाखल झालेल्या जानकरांचा बचाव कसा करायचा, असा पेच यानिमित्ताने सत्तापक्षापुढे निर्माण झाला आहे.

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपुरातील विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा आणि अंतिम आठवडा उद्यापासून सुरू होत आहे. पहिल्या आठवड्यात पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी नोटबंदीचा मुद्दा तापविला. त्याला सत्तापक्षाकडून मराठा आरक्षणावरील चर्चेचा प्रस्ताव आणून विरोधकांची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न झाला.

दरम्यान, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी अधिकाऱ्यास धमकावल्याचा गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण विरोधकांच्या आयतेच हाती लागले आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात हे प्रकरण तापण्याचे स्पष्ट चिन्ह दिसत असून जानकरांचा राजीनामाच मागण्याची रणनीती विरोधकांनी आखल्याचे कळते. १४ डिसेंबर रोजी नागपुरात मराठा-कुणबी महामोर्चाने गाजणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीचे पडसाद पुन्हा एकदा विधिमंडळात उमटणार आहेत.

राज्यातील आणि विशेषत: नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव राहणार आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करण्याची संधी विरोधी पक्षांना मिळणार आहे. त्यामुळे या सर्वच मुद्यांचा सामना करण्यात सत्तापक्षाला मोठीच कसरत करावी लागणार आहे.
महादेव जानकरांचे मात्र मौन
जानकर यांनी कायद्यानुसार या प्रकरणी होणाऱ्या कोणत्याही कारवाईचा सामना करण्याची तयारी असल्याचे सांगत मौन बाळगले आहे. त्यामुळे जानकरांचा बचाव कसा करायचा, असा पेच सत्तापक्षापुढे निर्माण झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...