आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात गव्हर्मेंट मेडिकल काॅलेज स्थापनेची माेहीम सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण व्हावे म्हणून अमरावतीकरांनी मोहीम सुरू केली असून, त्याला सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक कॅम्प परिसरातील आयएमए हॉल येथे पार पडलेल्या प्रथम बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रासह शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी बैठकीला उपस्थित राहून मोहिमेला पाठिंबा दर्शवला. 
पश्चिम विदर्भातील महत्वपूर्ण शहर असताना देखील अमरावती वैद्यकीय सुविधेमध्ये माघारत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांची वैद्यकीय सेवेसाठी ससेहोलपट होत आहे. शिवाय दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.
 
आधुनिक आरोग्य सेवा घेण्यासाठी येथील नागरिकांना नागपूर किंवा अकोला येथे जाण्याची वेळ आली आहे. आरोग्य यंत्रणेत ताळमेळ नसल्याने साथीचे आजार, गंभीर आजारांचा फैलाव झाल्यास अनेक नागरिकांवर जीव गमाविण्याची वेळ येते. योग्य किंवा चुकीच्या उपचारामुळे अनेकांचे जीव जात असल्याचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आरोग्याची ही निर्माण झालेली पोकळी लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याची मागणी समोर आली आहे. विदर्भ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचा निर्णय प्राथमिक कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व संघटनांना सोबत आंदोलन उभारणार असल्याची माहिती संयोजक किरण पातुरकर यांनी बैठकीत दिली. मागील अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात आहे. शहरात आरोग्य विषयक सुविधा अपुऱ्या आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसाेय वाढली अाहे. शासकीय मेडीकल कॉलेज झाल्यास शहरात नव्या आरोग्य सुविधा तसेच डॉक्टरांची चांगली टिम येईल, अशी अपेक्षा पातुरकर यांनी व्यक्त केली. यावेळी समन्वयक किरण पातुरकर, अनिल अासलकर, डॉ. बबन बेलसरे, डाॅ. पद्माकर सोमवंशी, रावसाहेब रॉय, लवीना हर्षे, डॉ. राजीव जामठे, संजय अग्रवाल, नरेश चव्हाण, सोपान गुडधे, गजानन देशमुख, शुभम जैन, स्वप्निल गावंडे आदी नागरिक उपस्थित होते. 

अन्य जिल्ह्यांच्या धर्तीवर मागणी 
विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आरंभ करण्यात आले आहे. या जिल्ह्याप्रमाणे अमरावती देखील महाविद्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. कृती समितीची पुढील बैठक ३० जून रोजी घेतली जाणार आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...