आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अधिकाऱ्यास धमकावण्याचा प्रयत्न, अमरावतीमधील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नांदगावपेठ एमआयडीसीतील शिव रबर कंपनीच्या मालकाने थेट कार्यालयात येऊन आपल्या टेबलवर ‘रिव्हॉल्वर’ ठेवून धमकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील प्रभारी प्रादेशिक अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दिली. राजा पेठ पोलिसांनी तक्रारीवरून रबर कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी घडली. 
 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी प्रादेशिक अधिकारी नागेश शांतारामजी लेहरकर (५५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २७ सप्टेंबरला लेहरकर त्यांचे पथक नांदगाव पेठ एमआयडीसीमधील शिव रबर कंपनीत गेले होते. कंपन्यांमध्ये जाऊन प्रदुषणाच्या दृष्टीने पाहणी करणे हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्तव्य आहे. दरम्यान, त्याचवेळी रबर कंपनीचे मालक श्रीवास्तव यांनी पाहणीसाठी गेलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाला माझ्या कंपनीत तुम्ही कसे आले, असे विचारत त्यांना धमकावले.
 
त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता श्रीवास्तव शहरातील अहिल्या मंगल कार्यालयाजवळील राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात गेले. प्रभारी अधिकारी लेहरकर यांच्या टेबलवर श्रीवास्तवने रिव्हॉल्वर काढून ठेवले. त्यामुळे सर्वच भयभीत झाले. वास्तविकता टेबलवर रिव्हॉल्वर ठेवण्याची आवश्यकता नव्हती. या प्रकारामुळे त्याच दिवशी लेहरकर यांनी राजा पेठ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी रात्री श्रीवास्तवविरुद्ध धमकावणे, शस्त्र वापराचे उल्लंघन करणे शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 
 
शोध सुरू आहे 
प्रदूषणमंडळाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून श्रीवास्तवविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो सद्या दिल्लीत असल्याची माहिती आहे. त्याच्याकडे ‘रिव्हॉल्वर’चा परवाना असल्याची माहिती मिळाली आहे. शस्त्राचा अशा पद्धतीने वापर करणे गुन्हा आहे. त्याचा शोध सुरू आहे. 
- किशोर सूर्यवंशी, ठाणेदार राजा पेठ. 
बातम्या आणखी आहेत...