आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सरकारी पोर्टल’मुळे समस्या सुटल्याचा सुखद अनुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वारंवार तक्रार करुन देखील दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाची एका युवकाने थेट ‘आपले सरकार पोर्टल’वर आॅनलाइन तक्रार केल्यानंतर रहाटगावात तब्बल तीन दिवस साफसफाई मोहीम राबविण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत शासनाच्या ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून समस्या सुटल्याचा सुखद अनुभव रहाटगाव येथील शुभम वऱ्हेकर या युवकास आला असून,वारंवार तक्रारी करुन दखल घेणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता विभागाचा दुर्लक्षीतपणा यानिमित्ताने उघड झाला आहे.
रहाटगाव प्रभाग क्रमांक मधील सुहास गोंगे यांच्या घराजवळ महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अनेक दिवसांपासून घनकचरा पडून होता. वऱ्हेकर यांच्या घरासमोरील नाली कचऱ्याने तुडूंब भरली होती. मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले होते. मागील काही महिन्यांपासून पडून असलेला कचरा नागरिकांच्या आरोग्याकरिता घातक ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी साफसफाई करण्याबाबत महापालिकेडके वारंवार तक्रारी केल्या, निवेदन दिली. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. प्रभागातील संबंधित नगरसेवकाकडे देखील तक्रार करुन उपयोग झाला नाही. शेवटी येथील शुभम वऱ्हेकर या युवकाने महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविली. ऑनलाइन तक्रार दाखल होताच पूर्वी आनाकानी करणारे महापालिकेचे अधिकारी चक्क रहाटगावात धावून आले. आपले सरकार पोर्टलवर दाखल तक्रारीवर केवळ दोन दिवसात कारवाई करण्यात आली. स्थानिक प्रशासनाकडून समस्यांची सोडवणूक होत नसेल तर महाराष्ट्र शासनाने ‘आपलं सरकार’ हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या ऑनलाइन पोर्टलचे मोबाइल अॅप्लीकेशन देखील तयार करण्यात आले आहे.

स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या नागरिकांना या मोबाइल अॅपच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनेकदा केलेल्या तक्रारींची दखल महापालिका प्रशासनानेच घेतली नाही, तर महाराष्ट्र सरकार काय घेणार असा प्रश्न युवकाला पडला होता. मात्र तक्रार केल्यानंतर त्याची दखल सरकारकडून घेण्यात आली. शासनाकडून रहाटगाव येथील साफसफाई करण्याची सूचना महापालिकेच्या संबंधित विभागाला देण्यात आली. आपलं सरकारच्या सूचनेची दखल घेत महापालिकेने एक दिवस नाही, तर तब्बल तीन दिवस रहाटगाव परिसरात साफसफाई मोहीम राबविली. तक्रारीची दखल घेत कचऱ्यापासून स्थानिकांची सुटका तर झालीच शिवाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट शासनापर्यंत पोहचण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

पोर्टलवर विविध शासकीय योजनांची माहिती
पोर्टलवर कृषी, पशु संवर्धन, मत्सव्यवसाय, सहकार- वस्त्रोद्योग विभाग, सहकार-पणन विभाग, कौशल्य विकास उद्योजकता विभाग, पर्यावरण विभाग, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग, उच्च तंत्र शिक्षण विभाग, गृह परिवहन आणि बंदरे विभाग, गृहनिर्माण विभाग, उद्योग विभाग, ऊर्जा विभाग, कामगार, विधी न्याय विभाग, वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग, अल्पसंखाक विभाग, नियोजन, ग्रामविकास, शालेय शिक्षण , आदिवासी विकास, जलसंपदा, पाणी पुरवठा स्वच्छता, महिला बालविकास आदी विभागांमधील योजनांची माहिती देण्यात आली आहे.

चांगला प्रतिसाद मिळतोय
^मनपातसेच संबंधित नगरसेवकाकडे वारंवार तक्रार करुनही साफसफाई होत नव्हती. आपले सरकारच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करताच दोन दिवसांत साफसफाई करण्यात आली. शासनाचा अत्यंत चांगला उपक्रम असून तक्रार केल्यास प्रतिसाद मिळतो.’’ शुभम वऱ्हेकर, तक्रारकर्ता

थेट तक्रारीची सोय
नागरिकांना उत्तम सेवा मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाकडून हे ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या सुविधेचे मोबाइल अॅप्लीकेशन देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावर समस्येची थेट तक्रार शासनाकडे करता येणार आहे.

तक्रारीची दखल ही चांगली बाब
^आपले सरकार पोर्टलवर करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाकडून साफसफाई करण्यात आली असेल तर ही चांगली बाब आहे. किमान यावरुन तरी महापालिका प्रशासनाला जाग आली. हे चांगलं आहे, आपले सरकार पोर्टलचे आपण अभिनंदन करु.’’ हेमंतपवार, आयुक्त,महापालिका, अमरावती.

अशी करा तक्रार
स्थानिक प्रशासन किंवा अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कार्य होत नसेल तर इंटरनेटच्या माध्यमातून अापले सरकार पोर्टल उघडत तक्रार करता येते. शिवाय मोबाइल अॅपमध्ये जावून संबंधित विभागाविरोधात तक्रार करता येते.
बातम्या आणखी आहेत...