आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटित झाल्यास सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही; आमदार बच्चू कडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांढरकवडा- शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे देशात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकरी हा विविध जातीपातीसह राजकीय पक्षांमध्ये विखुरल्या गेल्याने संघटित होऊ शकला नाही. शेतकरी जर एका झेंड्याखाली आला तर कोणतेही सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणार नाही, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. पांढरकवडा शहरात शुक्रवारी आयोजित जन आक्रोश सभेत ते बोलत होते. 

प्रहार जनशक्ती पक्ष आणि विलास पवार मित्र मंडळद्वारा पांढरकवड्यात आज जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आमदार बच्चू कडू यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. या वेळी शेतकरी नेते मोहन मामीडवार, प्रहार संघटनेचे विदर्भ-मराठवाडा संपर्क प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार, अकील सातोकर, के. जी. मुल्यालवार, रामकृष्ण पाटील, रमजान जादू, अफीज पोसवाल, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख नगरसेवक नितीन मिर्झापुरे, आशिष तुपटकर, आकाश समोशे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत, बाळासाहेब इंगळे, आकाश चिंचोळकर, अंकुश वानखडे, सुनील इंगोले, आदी उपस्थित होते. 

आमदार कडू यांनी शासनाच्या फसव्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला. धर्म जातीचे राजकारण करून तुम्ही सत्तेवर आला. मात्र, शेतकऱ्यांच्या शेतमालास भाव देता निर्यात बंदी लादता, कारखान्यात तयार झालेल्या मालाला चांगला भाव मिळतो. मात्र, शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने विक्री करता. लोकप्रतिनिधींचा पगार एका क्षणात दुप्पटीने वाढवण्यात येतो. निराधाराची मानधन वाढ व्हावी, म्हणून आम्ही मागील चार वर्षांपासून लढत आहो. तरीसुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे, असे प्रहार आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांनी आता तरी एका झेंड्याखाली येऊन संघटित होण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांसह निराधार महिला आणि दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुकाणू समितीतील सदस्यांवर आरोप केला. या आरोपात काहीच तथ्य नाहीत. आंदोलन करणे हे जर देशद्रोही कृत्य असेल, तर मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध करून दाखवावे, असे असल्यास आमदारकीचा राजीनामा देवू, शेतकऱ्यांप्रती शासनाची उदासीनता आणि सुकाणू समिती सदस्यांवर केलेल्या वक्तव्यावर आमदार कडू यांनी टीका केली. 

आमदारांचे पांढरकवड्यात स्वागत 
आज पांढरकवडा शहरात आमदार बच्चू कडू यांची जन आक्रोश सभा आयोजित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी सभेची जय्यत तयारी केली होती. दरम्यान दुपारच्या सुमारास आमदार बच्चू कडू पांढरकवडा शहरात पोहचले असता, त्या ठिकाणी उपस्थित असंख्य नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. 
बातम्या आणखी आहेत...