आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोट न घेताच ग्रामसेविका पुन्हा बोहल्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता पुन्हा बोहल्यावर चढण्याची पुरुषी प्रकरणे आजवर आपल्या ऐकिवात होती. अशा प्रकरणात पुरुषाला पोलिसी पाहुणचार मिळाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मात्र, नागपुरात आठ महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केलेली एक महिला दोन दिवसांनंतर अन्य एका पुरुषाबरोबर बोहल्यावर चढण्याची तयारी करत आहे.
विशेष म्हणजे विवाह अधिकाऱ्याच्या समक्ष साताजन्माची साक्ष घेणाऱ्या या महिलेने अद्याप पहिल्या नवऱ्यास रीतसर सोडचिठ्ठी दिलेली नाही. त्यामुळे विद्यमान नवरा न्यायासाठी लढा देण्याच्या तयारीत आहे. राजन (बदललेले नाव) असे नवऱ्याचे नाव असून तो पुण्यातील रिलायन्स जीवन विमा कंपनीत नोकरीला आहे. नोकरीत असतानाच सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी त्याची वर्धा येथे ग्रामसेवकपदावर कार्यरत असलेल्या रिमा (बदललेले नाव) नामक युवतीशी ओळख झाली.

हळूहळू दोघांतील मैत्रीने प्रेमाचे रूप घेतले. प्रेमाच्या आणाभाका घेत असतानाच दोघांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ११ नोव्हेंबर २०१४ रोजी दोघांचा वर्धा येथील जिल्हा विवाह अधिकाऱ्यासमोर तीन साक्षीदारांच्या समक्ष नोंदणी पद्धतीने विवाह पार पडला. दरम्यान, दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला आणि सुखी संसारासाठीच राजनने पुणे शहर सोडून वर्ध्याला रिमासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

दुसरा नवरदेव आहे राजकीय पुढारी
रिमा दुसऱ्यांदा ज्याच्यासोबत बोहल्यावर चढणार आहे तो वर्धा शहरातील एका राजकीय पक्षाचा पुढारी आहे. त्या मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पोलिसही राजनच्या तक्रारीवर कारवाई करीत नाही, असा आरोप राजनने ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. दरम्यान, यासंदर्भात रिमाच्या मोबाइलवर संपर्क करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता एका व्यक्तीने दूरध्वनी उचलला आणि संबंधित नावाचे कुणीही नसल्याची प्रतिक्रिया दिली.
दुसऱ्या लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या
सुमारे महिनाभरानंतर रिमाचा गैरसमज दूर झाला असेल असे समजून राजन पुन्हा वर्ध्याला परतला. मात्र, इकडे सर्व परिस्थिती बदलली होती. रिमाने राजनच्या अनुपस्थितीत चक्क दुसऱ्या लग्नाची तयारी केली होती. इतकेच नव्हे, तर लग्नपत्रिका वितरित झाल्या असून रविवार, १९ जुलैला विवाहाचा मुहूर्त आहे. दरम्यान, पत्नीला परत मिळवण्यासाठी राजन मात्र पोलिसांचे उंबरठे झिजवतोय.
पतीला अंधारात ठेवून केला पत्नीने गर्भपात
वर्ध्यात रिमा आणि राजन गुण्यागोविंदाने राहत होते. दरम्यान, रिमाला गर्भधारणा झाली. राजनला आपल्या संसाराच्या वेलीवर नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली होती. मात्र, लग्नाला पाच महिने उलटल्यानंतर रिमाने राजनला पुण्याला परत जाण्यास सांगितले. पत्नीच्या हट्टापायी राजनने पुन्हा नोकरीसाठी पुणे गाठले. मात्र, यादरम्यान रिमाने राजनला न विचारताच गर्भपात करून घेतला. काही दिवसांनी राजन पुण्याहून परतल्यानंतर रिमाने त्याच्यासाठी आपल्या आयुष्याची दारे बंद झाल्याचे सांगितले. कोणता वाद नाही किंवा तंटा नसताना पत्नी रिमाचे वागणे बघून राजनला धक्काच बसला. यानंतर राजनने रिमाला सावरण्यासाठी वेळ देत परत पुण्याची वाट धरली.
बातम्या आणखी आहेत...