आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- माहेरहूनहुंडा आणण्याच्या कारणावरून पती आणि पत्नी यांच्यात सुरू असलेल्या वादाने वेगळे वळण घेत पतीने गर्भवती पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे वार करुन तिला ठार केले होते. या प्रकरणातील आरोपीला दारव्हा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. व्ही. सेदानी यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शेख वसीम शेख नईम वय ३० वर्षे रा. दिग्रस असे त्या शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शेख वसीम हा त्याची पत्नी गुलबानो वय २१ वर्षे हिला माहेरहून हुंडा आणण्यासाठी सतत छळत होता. त्यावेळी या प्रकरणातील इतर आरोपी शेख वसीम याला गुलबानोला ठार करण्यासाठी चिथावणी देत होते. यावरून आरोपीने २० मे २०१३ रोजी रात्रीला त्याच्या भाड्याच्या घरात त्याची गर्भवती पत्नी गुलबानो हिच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे वार करुन तिला ठार केले. त्यानंतर तो रात्री हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन संशयास्पद फिरताना दिग्रस पोलिसांना आढळून आला. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर या प्रकरणात मृताची आई परिजान सलीम खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिग्रस पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एस. पी. ढाकरे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एकूण १० साक्षी तपासण्यात आल्या. या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने प्रकरण परिस्थितीजन्य स्वरुपाचे पुरावे असल्याने या प्रकरणात फिर्यादी पक्षाचे वकील अॅड. अमोल राठोड यांनी युक्तीवाद करीत विविध न्यायालयीन निवाड्यांचा दाखला दिला. त्यावरून न्यायाधीश के. व्ही. सेदानी यांनी शेख वसीम यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.