आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात जलफेरभरणासाठी गुजरात माॅडेल! भूजल सर्वेक्षणचा चमू अभ्यासासाठी जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्यातील पाण्याच्या नवनवीन स्रोतांचा शोध घेऊन लोकसहभागातून जलफेरभरण करण्यासाठी गुजरात माॅडेलचा उपयोग करण्यात येणार अाहे. या माॅडेलच्या अभ्यासासाठी नागपूर येथील भूजल सर्वेक्षण व विकास कार्यालयातील वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. के. देशकर यांच्या नेतृत्वात पाच जणांचा चमू सात जानेवारी राेजी गुजरातला जाणार असल्याची माहिती संचालक सुनील पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
  
दाेन डिसेंबरला दिल्ली येथे झालेल्या एका कार्यशाळेत ‘काॅम्पोझिट लँड असेसमेंट अँड रिस्टोरेशन टूल’ म्हणजेच ‘क्लार्ट’विषयी माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला अतिरिक्त उपसंचालक आय. आय. शाह हेही गेले होते. गुजरातमधील पर्यावरणीय सुरक्षा प्रतिष्ठानने (एफईएस) हे अॅप व साॅफ्टवेअर तयार केले आहे. महाराष्ट्रातही या साॅफ्टवेअरचा उपयोग करता येईल या उद्देशाने कार्यशाळेनंतर संबंधितांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अाठ  डिसेंबरला ‘एफईएस’चे टीम लीडर चिरंदीप गुहा यांनी नागपूर येथे सादरीकरण केल्याची माहिती अतिरिक्त उपसंचालक शाह यांनी दिली. 
 
घाटंजी येथे सुरू आहे प्रयोग : या अॅपच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे लोकसहभागातून जलफेरभरणाचा प्रयोग करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर गुजरातमध्ये झालेले प्रयोग, साॅफ्टवेअरच्या मदतीने लोकसहभागातून जलफेरभरणाच्या कामांच्या अभ्यासासाठी एक टीम जाणार अाहे.

ही कामे झाली सोपी  
पर्यावरणीय सुरक्षा प्रतिष्ठानचे अॅप अँड्राॅइड मोबाइल वा टॅबमध्ये सहज डाऊनलोड हाेते. यामध्ये स्थान आणि विशिष्ट माहिती टाकल्यास संपूर्ण डीपीआर तयार मिळतो. याचबरोबर कलर कोडेड मॅप तयार होतात. ग्रामीण भागात ‘जीपीएस’चा वापर करीत अचूक स्थळ नोंदवल्यास माती परीक्षणासह भूजल स्तराचा नकाशा मिळतो. यामुळे काम अधिक सोपे झाले आहे.

असे आहे साॅफ्टवेअर  
‘एफईएस’ने विकसित केलेल्या या साॅफ्टवेअरमध्ये सुदूर संवेदन संस्था तसेच जिआॅलाॅजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे नकाशे व माहितीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे ज्या पाण्याचा शोध घ्यायचा त्या भागातील जमिनीचा पोत, खडकांचे विघटन होण्याचे प्रकार, भूशास्त्रीय रचना, जलस्रोतांचा उतार व फेरभरणाची क्षमता अशी संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळते. भौगोलिक माहिती प्रणालीमुळे (जीअायएस) वेळ, पैसा व श्रमाचीही बचत होते.  
 
 
बातम्या आणखी आहेत...