आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल विभागाकडून शहरातील गुटखा विक्रीचे छुप्पे चित्रीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात पंधरा दिवसांपुर्वी महसूल विभागाने केलेल्या कारवाईत एकाच ठिकाणाहून तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईनंतरही शहरात सर्रास गुटखा मिळत असल्याची बाब महसूल विभागाच्याच कर्मचारी, अधिकाऱ्यांनी शहरात छुप्या पद्धतीने केलेल्या चित्रीकरणातून समोर आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरूवारी (दि. १४) पुन्हा कारवाईचे आदेश दिले. दरम्यान दुपारपासून बडनेरा परिसरात महसूल एफडीएच्या पथकाने बेलोरा विमानतळाजवळ असलेल्या एका गोदामात धाड टाकली असता त्याठिकाणी सुमारे आठ ते दहा लाखांची स्विट सुपारी तसेच बडनेरामध्ये हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
शहरात मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गुटख्यामुळे अमरावती गुटखा विक्रीचे मोठे केन्द्र असल्याचे समोर आले होते. तो गुटखा जप्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तातडीने नष्ट केला होता. असे असले तरी शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा, पानमसाला खुलेआम पध्दतीने काही किराणा दुकानात पानटपऱ्यांवर मिळत आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर मागील दोन दिवसांपासून त्यांनी काही कर्मचारी अधिकाऱ्यांना शहरातील गुटखा विक्रीचे वास्तव चित्रीत करण्यास सांगितले होते. त्यानूसार महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांनी शहरात सर्वदूर फिरून गुटखा विक्रीचे फोटो व्हीडीओ काढले आहे. हे वास्तव पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरूवारी पुन्हा अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, तिवसा तहसीलदार राम लंके यांना कारवाईचे आदेश दिले. या आदेशामुळे तिन्ही तहसीलदार, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी मेश्राम, नायब तहसीलदार मुन्ना माळवे, २५ ते ३० अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी सयुंक्तपणे गुटखा शोधमोहीम सुरू केली. दरम्यान बेलोरा विमानतळाजवळ असलेल्या एका ट्रान्सपोर्टमध्ये या पथकाला मोठ्या प्रमाणात स्विट सुपारी मिळून आली आहे. या सुपारीची किंमत अंदाजे आठ ते दहा लाख रुपये असल्याचे महसूलच्या सूत्रांनी सांगितली. बडनेरामधून एका किराणा दुकानात हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाईच्यावेळी एफडीएचे अधिकारी, कर्मचारीसुध्दा पथकासोबत हजर होते.

यापुढेही कारवाई सुरूच राहणार
^शहरात सुरू असलेले गुटखा विक्रीचे वास्तव चित्रीत करण्यात आले आहे. गुटखा विक्री होवू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे. अनेक किराणा दुकान पानटपरीवर गुटखा, पानमसाला मिळतो, हा कुठून येत आहे, याचा शोध घेवून तो जप्त करण्यात येईल. दरम्यान गुरूवारी सांयकाळी आम्ही अंदाजे लाखांची स्विट सुपारी ते हजारांचा गुटखा जप्त केला आहे. यावेळी एफडीएचे अधिकारीसुध्दा सोबत होते. सुरेशबगळे, तहसीलदार, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...