आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' घोषणेस मूठभर मुस्लिमांचा विरोध, संघ नेते इंद्रेशकुमार यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- भारत माता की जय.. घोषणेस विरोध करणे अज्ञानच आहे. मुस्लिम समाजातील मूठभर घटकांचा याला विरोध आहे. त्यांचे अज्ञान दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संस्थापक व संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमार यांनी दिली.
मुस्लिम राष्ट्रीय मंचाची तीन दिवसीय बैठक शनिवारी नागपुरात सुरू झाली. या बैठकीत देशभरातून दीडशेच्या आसपास प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. बैठकीच्या उद्घाटनसत्रापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना इंद्रेशकुमार यांनी मुस्लिम समाजाशी संबंधित विविध मुद्यांवर स्पष्टीकरण दिले. मुस्लिम राष्ट्रीय मंच ही संघ परिवाराशी संबंधित संघटना असल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला.काही मुस्लिम नेत्यांनी संघाशी संपर्क साधल्यावर त्यांना आम्ही केवळ मार्गदर्शन व मदत करीत आहोत, असा दावा त्यांनी केला. 'भारत माता की जय' या घोषणेत कुठेही मूर्तिपूजा नाही, असे स्पष्ट करून इंद्रेशकुमार म्हणाले, हीच घोषणा उर्दूत "मादरे वतन हिंदुस्तान िजंदाबाद' या शब्दात दिली जाऊ शकते. मुस्लिम समाजात पुढाऱ्यांना पुष्पहार घातला जात असेल तर ती मूर्तिपूजा नाही काय? असा सवाल त्यांनी असदुद्दीन ओवेसी व विरोध करणाऱ्या मौलानांना केला.
मुस्लिम युवकांनी दहशतवादाचा मार्गाने जाऊ नये यासाठी डोन्ट जॉइन आयएसआयएस सेल तयार करण्यात येणार आहे. या सेलच्या माध्यमातून देशभर जागृती करण्यात येणार अाहे. याशिवाय मुस्लिम राष्ट्रीय मंचाचा युवा सेलही तयार होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
भारत माता की जय मिरवणूक : मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे सोमवारी "भारत माता की जय' असा जयघोष करणारी मिरवणूक काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ताजबाग येथून ही मिरवणूक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृतीमंदिर परिसर मार्गे दीक्षाभूमीवर जाणार आहे.
शंकराचार्यांनी विचार करून बोलावे
शंकराचार्य स्वरूपानंद यांनी विचार करून बोलावे, असा सल्ला इंद्रेशकुमार यांनी दिला. कुठल्याही धार्मिक स्थळात प्रवेशाच्या मुद्यावर चर्चा करून तोडगा काढावा, असे ते म्हणाले. मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.