नागपूर - नागपुरातील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेने परग्रहावरील एलियन प्रमाणे दिसणाऱ्या दुर्मिळ अशा हर्लेक्विन बेबीला जन्म दिला. जंतूसंसर्गाचा धोका लक्षात घेऊन बाळाला अतिदक्षता विभागातच निगराणीखाली ठेवण्यात आले होते, मात्र सोमवारी दुपारी 4 च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. भारतातील पहिल्या 'हार्लेक्विन बेबी'चा 48 तासानंतर मृत्यू झाला. या प्रकारच्या आजारात मुलाच्या आउटर स्किनचा विकास होत नाही. सोमवारी रात्री डॉक्टरांनी या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती वाचू शकली नाही.
जगभरात असे 12 प्रकरण..
- नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटलचे डीन डॉ. काजल मित्रा यांनी सांगितले की, या मुलीला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
- शनिवारी सायंकाळी अमरावतीमधील एका 23 वर्षीय महिलेने या मुलीला जन्म दिला.
- जगात 1750 पासून आतापर्यंत असे 12 प्रकरणं समोर आले आहेत.
- या प्रकारातील पहिले बाळ अमेरिकेतील साउथ कॅरोलिनामध्ये एप्रिल 1750 मध्ये जन्मले.
- अलिकडे जर्मनी आणि पाकिस्तानमध्ये अशा मुलांचा जन्म झाला होता.
ते बाळ पाहिल्यावर प्रसूती करणाऱ्या डॉ. प्राची सक्सेना यांना प्रचंड धक्काच बसला. त्यांच्यासोबत डॉ. यश बानाईत हेदेखील होते. परग्रहावरील एखाद्या एलियन प्रमाणेच त्या बाळाचा चेहरा दिसत होता. बाळाची त्वचा अतिशय कडक होती व अंगावर ठिकठिकाणी भेगा पडल्या असल्याचे आढळून आले. डोळे व तोंडाची रचना देखील अतिशय विचित्र होती. डॉ. सक्सेना व त्यांच्या चमूने लगेच प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. सुलभा जोशी, बालरोगतज्ज्ञ डॉ. यू. जे. अणेकर यांना बाळाची माहिती दिली. बाळाला लगेच अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तेथे त्याच्यावर विविध उपकरणांच्या माध्यमातून सातत्याने निगराणी सुरू होती. त्याचे वजन १.८ किलो एवढे होते.
१७ आठवड्यानंतर बाळाच्या आईची सोनोग्राफी बाहेर झाली होती. मात्र, सोनोग्राफीत त्वचेचा आजार लक्षात येण्याची शक्यता खूप कमी असते, असे डॉ. मित्रा यांनी सांगितले. या बाळाचा विचित्र चेहरा व शरीर पाहिल्यावर धक्का बसण्याची शक्यता लक्षात घेऊन आईला अद्याप कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. मात्र, त्याच्या वडीलांना ते दाखविल्यावर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. ते काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले. बाळाच्या माता-पित्याचे नावही जाहीर करण्यास हॉस्पिटलने नकार दिला असून ते वैद्यकीय कारणास्तव गुप्तच राखले जाणार आहे.
तीन लाखांत एखादेच बाळ असे
हॉस्पिटलचे अधीष्ठाता डॉ. काजल मित्रा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, प्रकारचे बाळ जन्माला येणे हे अतिशय दुर्मिळ आहे. सध्या जगात अशा प्रकारचे दोनच बाळ अस्तित्वात असून एक जर्मनीत तर दुसरे पाकिस्तानात असल्याचे इंटरनेटवरील माहितीच्या आधारे सांगू शकतो. असे बाळ तीन लाखात एखादे जन्माला येते. पण आम्ही ते पहिल्यांदाच पाहत आहोत, अशी कबुलीही त्यांनी दिली.
जनुकीय दोषांमध्ये हर्लेक्विन बाळ
डॉ. मित्रा म्हणाले,जनुकीय दोषांमध्ये हर्लेक्विन बाळ जन्माला येते. हा त्वचेचा अत्यंत गंभीर असा आजार असून बाळाच्या शरीरावर त्वचेचे कडक असे आवरण असते. त्वचेच्या विशिष्ट आकाराच्या खपल्या तयार होतात. त्यामुळे अशा बाळांच्या त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे बाळ किती काळ जगेल हे सांगणे कठीण असते.