आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात जन्मलेल्या हर्लेक्वीन बेबीचा मृत्यू; मृतदेह अभ्यासासाठी जतन करणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपुरात शनिवारी जन्माला आलेल्या हर्लेक्वीन बाळाचा (एलियनसारख्या दिसणाऱ्या) अखेर सोमवारी दुपारी मृत्यू झाला. नागपूरजवळील बाजारगाव येथे राहणाऱ्या एका महिलेने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म दिला. ते बाळ एखाद्या एलियनप्रमाणे दिसत होते. त्यामुळे बाळाचे स्वरूप पाहिल्यावर सुरुवातीला डॉक्टरही हादरून गेले होते. बाळाची त्वचा अतिशय कडक होती. त्यावर ठिकठिकाणी भेगा पडलेल्या होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी बाळाची पाहणी केल्यावर तो हर्लेक्वीन बेबी असल्याचे निदान झाले. जनुकीय दोषांमुळे त्वचेचा हा गंभीर आजार होतो, अशीही माहिती डाॅक्टरांनी दिली होती.
शनिवारी बाळाचे सर्व वैद्यकीय घटक अतिशय सामान्य होते. तथापि, ते वाचण्याची फारशी शक्यता नाही, असा अंदाज डॉक्टरांनी त्याच दिवशी वर्तवला होता. रविवारी मात्र बाळामध्ये बरेच बदल होऊन त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ऑक्सिजन लावण्यात आला. त्यानंतरही त्याची प्रकृती सातत्याने बिघडत जाऊन सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलचे अधीष्ठाता डॉ. काजल मित्रा यांनी दिली. बाळाच्या आईला त्याची प्रकृती चांगली नसल्याची माहिती रविवारी देऊन तिची मानसिक तयारी करण्यात आल्याचे डॉ. मित्रा यांनी सांगितले. दरम्यान, बाळाचा मृतदेह अभ्यासाच्या दृष्टीने तसेच हॉस्पिटलच्या संग्रहालयात ठेवण्याच्या दृष्टीने हॉस्पिटलचे व्यवस्थापन विचार करीत आहे. यासाठी बाळाच्या माता-पित्याच्या संमतीची गरज असून त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...