आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसासह गारपीट, दोन जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात शहरासह सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह काही तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाली. जिल्ह्यात वीज पडून दोघांचा तर झाड कोसळून एका बकरीचा मृत्यू झाला. मोर्शी तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांची छपरे उडाली. मेळघाटसह जिल्ह्यातील मैदानी तालुक्यात गारपीट झाली. वादळी पावसामुळे कांदा, संत्र्याच्या आंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले.

जिल्ह्यात अमरावती शहरासह सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. शहरात सुमारे अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला. धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली. चौसाळा (ता. अचलपूर) येथील शेतमजूर रमेश उत्तम भलावी (वय ४०) यांचा शेतातून घरी परत येत असताना वीज कोसळून मृत्यू झाला. बडनेरा येथे रात्री मध्यरात्रीच्या सुमारास वादळामुळे वीज गेल्याने हनुमान बकाले (वय २९) घराबाहेर आले होते. दरम्यान, त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. मोर्शी तालुक्यात नेरपिंगळाई, लेहेगाव, शिरखेड, काटपूर धामणगाव, तळेगाव, विष्णोरा आदी भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. वादळी वाऱ्यामुळे गावातील घरावरची छप्परे उडून गेली. तळेगाव येथे झाड कोसळल्याने एका बकरीचा मृत्यू झाला. मोर्शी तालुक्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी गावांना भेटी दिल्या. चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी, अंबाडा, परिसरातही पाऊस गारपिटीने हजेरी लावली. मेळघाटातील धारणी चिखलदरा तालुक्यातही मुसळधार पावसासह गारपीट झाली.

कांदा, संत्र्याचे नुकसान
जिल्ह्यात झालेल्या वादळी पाऊस गारपिटीमुळे काढणी केलेल्या कांद्यासह संत्र्याच्या आंबिया बहाराला जबर फटका बसला. चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी तालुक्यातील आंबिया बहाराचे प्रचंड नुकसान झाले.

बातम्या आणखी आहेत...