आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीच्या पाच दिवसांत होते 12 कोटींची उलाढाल, भयावह मुखवट्यांची वाढली मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सृष्टी जीवनातील बदलत्या रंगांचे प्रतीक म्हणजे होळी. पावित्र्य, प्रेम, शांती अन् सर्वांबद्दल आदर व्यक्त करण्याचा सण. या सणाला काहीतरी वेगळे करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. इको फ्रेंडली होळीत वेगळेपणा आणण्यासाठी बहुतेकांनी विनोदी, भयावह, पक्षी, प्राणी, कॉमिक्समधील हिरो कार्टुनमधील पात्रांचे चेहरे असलेले मुखवटे घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुले, युवक, युवतींसह ज्येष्ठांनाही या मुखवट्यांचे आकर्षण असल्यामुळे त्यांची बाजारातील मागणी चांगलीच वाढली आहे. होळीच्या या पाच दिवसांत शहरासह जिल्हाभरात १२ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
अगदी ३० रुपयांपासून ते अगदी ३०० रु. पर्यंतचे प्लॅस्टीक, रबरी मुखवटे बाजारात आले आहेत.त्यांना मागून कापडाने शिवल्यामुळे ते चेहऱ्यावर घातले की, मानेपर्यंत संपूर्ण चेहरा झाकला जातो. त्यामुळे मुखवटा घातलेला व्यक्ती कोण हे सहज ओळखता येत नाही.
 
केवळ शारीरिक हालचालींवरून जवळच्याच व्यक्तीला किंवा ज्यांना त्याने हा मुखवटा घातला हे माहीत आहे, त्यालाच त्याची ओळख पटवता येते. त्याचप्रमाणे हृदय, चक्र, चांदणी या आकाराचे लाईट्स चमकणारे गॉगल्सही सध्या भाव खाऊन जात आहेत. 
 
क्रिश चित्रपटातील गॉगललाही लहान मुले तरुणांची चांगलीच पसंती मिळत आहे. एव्हाना पिचकाऱ्यांचे आकारही चांगलेच देखणे मजबूत आले असून पारंपरिक पिचकाऱ्यांसह पंपाद्वारे पाणी सोडणाऱ्या विविध रंगी लहान-मोठ्या आकाराच्या ५० ते एक हजार रुपया पर्यंतच्या पिचकाऱ्या बाजारात दिसत आहेत.
 
 यंदा पिचकाऱ्यांना मात्र फारसा उठाव दिसला नाही. त्याऐवजी डोक्यावरील विग, विविधरंगी गुलाल खरेदीवर भर दिला जात होता. रंग उठून दिसावेत म्हणून पांढरे कपडे, विविध आकाराच्या टोप्या, मुखवटे, चष्मे, आकर्षक लहान-मोठ्या पिचकाऱ्या, गुलाल, रंग, रंगांचे सुगंधित स्प्रे, रंगांच्या बॉटल्स अशा विविध वस्तुंची जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहेत. 
 
चायनीजची आवक ५० टक्क्यांनी घटली 
आजवर होळीच्या बाजारावर चायनीज वस्तुंची पूर्णत: छाप दिसायची. मात्र यंदा बाजारात सुमारे ५० टक्क्यांनी चायनीज वस्तुंची आवक घटली आहे. भारतीय पिचकाऱ्या, रंग, गुलाल, मुखवटे, चष्मे, टोप, टोप्या, विग चायनीज वस्तुंपेक्षा दर्जेदार, टिकाऊ आणि किफायती असल्याचे खुद्द ठोक विक्रेत्यांनीही मान्य केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...