आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादच्या गुरूंनी दिले उत्पन्न वाढीचे धडे, महापालिकेत कार्यसंस्कृती वाढवण्यासाठी प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कर निर्धारण कसे करावे येथपासून ते निर्धारित कर वसूल करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतानाच उत्पन्नाचे नवे स्रोत जाणून घेण्याची संधी शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यामुळे सुटीचा दिवस अत्यंत फलदायी ठरला, अशी प्रतिक्रिया उमटली होती. विशेष असे की, यासाठीचे मॅनेजमेंट गुरू हे हैद्राबादचे होते.
देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण देणाऱ्या आंध्र प्रदेशातील यूडीआरआय (अर्बन डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट) संस्थेचे संचालक पी. नरसिंगराव, विषयतज्ज्ञ नरेंद्रकुमार अष्टेकर डॉ. अजित साळवी, मुंबई मनपाचे सेवानिवृत्त अभियंता आनंद देवधर आणि उपअभियंता मनोहर सोहनी यांचा त्या मॅनेजमेंट गुरूंमध्ये समावेश आहे. या चमूचे सर्व सदस्य शुक्रवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले. त्यांपैकी अष्टेकर नरसिंगराव यांनी आजच्या पहिल्या दिवशी विविध विषयांची मांडणी केली. मनपाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता शिबिराचा प्रारंभ झाला. साडेदहा ते दुपारी वाजेपर्यंत ‘शहर नियोजनातून महसूल उत्पन्न’ हा विषय मांडला गेला. मालेगाव मनपाचे निवृत्त उपायुक्त नरेंद्रकुमार अष्टेकर यांनी या विषयाची मांडणी केली. त्यानंतर दुपारी अडीचपासून यूडीआरआयचे संचालक पी. नरसिंगराव यांनी प्रशासकीय यंत्रणा आस्थापना व्यवस्थापन, मानव संसाधन आणि प्रशासकीय बाबी हे विषय समजून सांगितले. दोन्ही विषयांच्या मांडणीनंतर प्रश्नोत्तरे झाली.

चर्चे दरम्यान घर, दुकाने, कार्यालये आदी इमारतींचे करयोग्य मूल्य कसे ठरवावे, कर आकारणी कशी केली जावी, ती वसूल करण्याची रीत कशी असावी, आदी मुद्दे समजून घेतले गेले. सहायक आयुक्त राहुल ओगले, नरेंद्र वानखडे, प्रणिता घोंगे, कर निरीक्षक मंगेश वाटाणे आदींनी प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांमुळे उपस्थितांच्या मनातील अनेक बाबींची उकल झाली. शिवाय बरेचसे न्यायालयीन खटले, त्या खटल्यांच्या निकालातून तयार झालेल्या नव्या तरतुदी, त्याला अनुसरून करावी लागणारी अंमलबजावणी हे मुद्देही स्पष्ट झाले. प्रारंभी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ झाला. या वेळी उपायुक्त चंदन पाटील, करमूल्य करनिर्धारण अधिकारी महेश देशमुख, सहायक आयुक्त योगेश पिठे, नगरसचिव मदन तांबेकर, शहर अभियंता जीवन सदार, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, उपअभियंता प्रमोद कुळकर्णी, मंगेश कडू, गोपाल अटल, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, आस्थापना विभागाचे अधीक्षक डी. जी. अलूडे, दिलीप पाठक आदी उपस्थित होते.

पाणीपट्टी म्हणजे पाणी कर नव्हे : मालमत्ताकरात समाविष्ट असलेली पाणीपट्टी म्हणजे पाणी कर नव्हे, हा नवा मुद्दाही या प्रशिक्षणादरम्यान पुढे आला. स्रोतापासून घरापर्यंत पाणी पोहोचवण्याची सोय उपलब्ध करून दिल्यास ‘स्पेशल वॉटर टॅक्स’ही आकारता येतो, असे अष्टेकर यांच्या संबोधनातून स्पष्ट झाले.

आजही चार विषयांची मांडणी : रविवारी प्रशिक्षणाचा अंतिम दिवस असून,पहिल्या सत्रात घनकचरा स्वच्छता व्यवस्थापनासह इतर चार बाबींवर डॉ. अजित साळवी, पी. नरसिंगराव, आनंद देवधर मनोहर सोहनी मार्गदर्शन करणार आहेत.